प्रतिनिधी: अनेकांच्या जीवनात सिगारेटचे महत्व अनन्यसाधारण असते. सध्या व्यसनाधीनता वाढत असताना दुसरीकडे मात्र धुम्रपानाचा शौक शौकिनांसाठी आणखी महागणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थावरील एक्साईज करात मोठी वाढ करणार असल्याचे अधिकृत निवेदनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले होते. तो निर्णय आता १ फेब्रुवारीपासून अधिकृतपणे सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादनावर लागू होणार आहे. त्यामुळे याचा मोठा फटका उत्पादकांना बसल्याने या गोष्टीचा एकूणच फटका सिगारेट इंडस्ट्रीला बसणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार, १००० सिगारेट मागे अतिरिक्त २०५० ते ८५०० पर्यंत अतिरिक्त एक्साईज शुल्क कराच्या स्वरपात आकारले जाईल.
याचा आर्थिक भार कंपन्यांवर पडणार असल्याने तंबाखू व सिगारेट उत्पादक उत्पादनांच्या किंमतीत किमान १२ ते १५% वाढ करु शकतील. कंपन्यांनी आगामी उत्पादनांच्या बॅच साठी भाववाढीची तयारी सुरु केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, १ फेब्रुवारीपासून ही दरवाढ लागू होत असताना किमान १ आठवडा आधी या नव्या किंमतीची अंमलबजावणी आपल्या एमआरपीतून कंपन्या करू शकतात. अद्याप तशी प्रतिक्रिया कंपन्यांनी दिली नसली तरी १ फेब्रुवारीपासून प्रति सिगारेट किंमतीत वाढ होणार आहे हे निश्चित असेल.प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, आयटीसी, गॉडफ्रे फिलिप्स कंपन्या आपल्या सिगारेटच्या किंमतीत वाढ करू शकतात.
त्यामुळे आता संपूर्ण झालेल्या कंपेनसेशन सेसची जागा आता हे अतिरिक्त शुल्क घेणार असून सध्या असेलल्या जीएसटी दरात या अतिरिक्त एक्साईज शुल्काची भर पडणार असल्याने तंबाखू सेवन करण्याऱ्यांच्या खिशाला अतिरिक्त चाट बसणार आहे. तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादने हे सीन गूडस (पाप वस्तू) प्रवर्गात येत असल्याने सरकारने अशा वस्तूवरील कर मोठ्या प्रमाणात वाढवण्याच्या निर्णय घेतला. गेल्याच महिन्यात डिसेंबरमध्ये संसदेने दोन विधेयके मंजूर केली होती ज्यात पान मसाल्याच्या उत्पादनावर नवीन आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर आणि तंबाखूवर उत्पादन शुल्क लावण्याची परवानगी विधेयक पारित करून मिळवली गेली होती.