"तन्वी तुम्ही आहात या घराच्या तंटा क्वीन!" - रितेश देशमुख
"रुचिता जामदार महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला पंजा मारणारी वाघीण बघितली" - रितेश देशमुख
मुंबई : मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात मोठा कार्यक्रम 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची सर्वत्र चांगलीच हवा आहे. पहिला आठवडा वादाच्या ठिणग्यांनी, टास्कने आणि काही भावुक क्षणांनी गाजला. रितेश भाऊची हटके स्टाईल आणि १७ सदस्यांचा हटके खेळ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. काहीच तासांत यंदाच्या सीझनचा पहिला 'भाऊचा धक्का' पार पडणार आहे. या 'भाऊच्या धक्क्या'वर सदस्यांची पोलखोल होणार आहे. अखेर वेळ आली आहे ती या सगळ्या वादाचा हिशोब करण्याची. सुपरस्टार रितेश देशमुख आज पहिल्या 'भाऊच्या धक्क्यावर' सदस्यांची कानउघडणी करताना दिसणार आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुखने तन्वी कोलते आणि रुचिता जामदार यांच्या वागण्यावर त्यांची चांगलीच शाळा घेतल्याच दिसून येत आहे.
तन्वी कोलते 'तंटा क्वीन'
पहिल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख तन्वी कोलतेवर चांगलेच चिडलेले दिसत आहे. रितेश देशमुख म्हणाले, "तन्वी कोलते किती बोलते... तुम्ही आहात या घराच्या तंटा क्वीन!" तन्वीच्या वागण्यावर टीका करताना रितेश पुढे म्हणाले की, तिला फक्त बोलायचं असतं, भांडायचं असतं आणि ते झालं की मग रडायचं असतं. त्यांनी तिला स्पष्ट शब्दांत सुनावलं की, "तुमच्या जिभेचा ब्रेक फेल झालेला आहे." जेव्हा तन्वीने स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रितेश यांनी तिला "मी बोलतोय, थांब एक मिनिट" असं म्हणत गप्प केलं.
रुचिता : घराचा 'वॉईस' की 'नॉईज'?
दुसरीकडे, रितेश यांनी रुचिताच्या वागण्यावरही निशाणा साधला. सुरुवातीला रुचिताने स्वतःची ओळख 'वाघीण' म्हणून करून दिली होती, ज्याचा संदर्भ घेत रितेश म्हणाले, "महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला पंजा मारणारी वाघीण बघितली." रितेशने तिच्यावर टीका करताना अत्यंत मार्मिक विधान केलं. ते म्हणाले, "महाराष्ट्राला वाटलं होतं की तुम्ही या घराचा 'Voice' व्हाल, पण सध्या तुम्ही या घराचा फक्त 'Noise' आहात."
प्रोमो हायलाईटस
प्रोमो १: तन्वीची कानउघडणी
काय घडलं: रितेशने तन्वीला 'तंटा क्वीन' म्हटलं... "तुमच्या जिभेचा ब्रेक फेल झाला आहे."
प्रोमो २: रुचितावर टीका
काय घडलं: रुचिताच्या 'वाघीण' या इमेजवर रितेशने फिरकी घेतली.
नक्की बघा, ‘बिग बॉस मराठी - भाऊचा धक्का’, आज रात्री ८:०० वा. फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर!