नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्ली तसेच हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांमध्ये सुरक्षेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या इनपुटनुसार, २६ जानेवारीपूर्वी देशविरोधी कारवायांचा धोका लक्षात घेता सुरक्षा यंत्रणा अधिक सावध झाल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानी गटांशी तसेच शेजारील देशातील काही कट्टरपंथी संघटनांशी संबंधित नेटवर्क सक्रिय असल्याचे संकेत मिळाले आहेत. काही आंतरराष्ट्रीय हँडलर्स स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांचा वापर करून देशांतर्गत अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गुप्तचर अहवालात पंजाबमधील काही कुख्यात गटांचे संबंध दिल्ली-एनसीआर, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये कार्यरत असलेल्या गुन्हेगारी साखळीशी जोडले जात असल्याचा उल्लेख आहे. यामुळे या भागांतील गर्दीच्या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याआधी नोव्हेंबर २०२५ मध्ये दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर यंदा कोणताही धोका टाळण्यासाठी सुरक्षेची पातळी अधिक वाढवण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिन संचलनापूर्वी दिल्ली पोलिसांनी राजधानीतील संवेदनशील ठिकाणी तयारीची चाचणी घेतली. कर्तव्य पथासह लाल किल्ला परिसर, कश्मीरी गेट, चांदणी चौक आणि काही प्रमुख मेट्रो स्थानकांवर मॉक ड्रिल राबवण्यात आली. या सरावाचा उद्देश संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्याची क्षमता तपासणे आणि नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे हा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.