या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली होती. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नाशिक या महापालिकांमध्ये पक्षाला मजबूत कामगिरी करता यावी यासाठी त्यांनी आखलेली रणनीती निर्णायक ठरल्याचे चित्र आहे.
धुळे महापालिकेतही भाजप अनेक प्रभागांमध्ये आघाडीवर असून, सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. नाशिकमध्येही भाजपने प्रभावी कामगिरी केली आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वच पालिकांमध्ये भाजपची सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे चित्र आहे.
जळगाव महापालिकेत भाजप आणि शिवसेना यांचे मिळून काही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर ही संख्या वाढली. यामुळे निवडणुकीआधीच पक्षांना बळ मिळाले होते. या निकालांमुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपची पकड अधिक घट्ट होत असल्याचे स्पष्ट झाले असून, गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाची आणि राजकीय अनुभवाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.