मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७ हक्काच्या जागा गमवाव्या लागल्याची माहिती समोर आली आहे. अनेक प्रभागांमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीने मिळवलेली मते ही थेट उबाठा गट आणि मनसेसाठी घातक ठरली आहेत.
या निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी करत ‘मुंबई विकास आघाडी’ स्थापन केली होती. या आघाडीने विशेषतः मुस्लीम आणि दलित बहुल प्रभागांमध्ये स्वतंत्र ताकद लावली. मात्र, या ताकदीचा मोठा फटका उबाठा आणि मनसेला बसल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले.
प्रभाग क्रमांक २० मध्ये भाजपचे दीपक तावडे (१०,२५८ मते) विजयी झाले, तर मनसेचे दिनेश साळवी (७,५३०) आणि काँग्रेसचे मस्तान खान (३,३५१) यांच्यातील मतविभाजनामुळे मनसेचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक २३ मध्येही असाच प्रकार पाहायला मिळाला. भाजपचे शिवकुमार झा (७,०९०) विजयी झाले, तर मनसेचे किरण जाधव (५,८१०) आणि काँग्रेसचे आर.पी. पांडे (१,३१७) यांच्यातील मतविभाजन मनसेच्या पराभवाला कारणीभूत ठरले.
कुठे काय घडले?
- प्रभाग क्रमांक ५२ मध्ये भाजपच्या प्रीती सातम (९,९७१) यांनी उबाठा गटाच्या सुप्रिया गाडावे (८,९५३) यांचा पराभव केला. येथे काँग्रेसच्या स्वाती सांगळे यांना मिळालेली १ हजार ३९९ मते निर्णायक ठरली. प्रभाग १२६ मध्येही भाजपच्या अर्चना भालेराव (११,१३४) यांनी उबाठा गटाच्या शिल्पा भोसले (१०,२६३) यांच्यावर मात केली. काँग्रेसच्या साजिदा खान यांना मिळालेली १ हजार ६५ मते उबाठा गटासाठी घातक ठरली.
- प्रभाग क्रमांक १६६ मध्ये शिवसेनेच्या मीनल तुर्डे (६,४३५) विजयी झाल्या, तर मनसेचे राजन खैरनार (४,४८०) आणि काँग्रेसचे घनश्याम भापकर (३,२८६) यांच्यातील मतविभाजनाने मनसेची संधी हिरावली. प्रभाग क्रमांक १७४ मध्ये भाजपच्या साक्षी कनोजिया (५,५२३) यांनी उबाठा गटाच्या पद्मावती शिंदे (३,०७८) यांचा पराभव केला. येथे काँग्रेसच्या ईश्वरी वेलु (२,९२१) यांची मते निर्णायक ठरली.
- वॉर्ड क्रमांक १७५ मध्ये शिवसेनेच्या मानसी सातमकर (६,८९५) विजयी ठरल्या, तर काँग्रेसच्या ललिता यादव (६,६४६) आणि मनसेच्या अर्चना कासले (२,७५९) यांच्यातील मतविभाजनाचा ठाकरे गटाला अप्रत्यक्ष फटका बसला.