मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी दीड वाजेपर्यंत मुंबई महापालिकेसाठी २९.९६ टक्के मतदान झाले आहे. हळू हळू मतदानाचा जोर वाढू लागला आहे.
निवडणूक कोणतीही असू दे मुंबईत संध्याकाळी शेवटच्या दोन तासांमध्ये मतदान अनेकदा वाढते. यामुळे यंदाच्या मनपा निवडणुकीत एकूण मतदानाची टक्केवारी ही किती टक्क्यांनी वाढणार यावरुन चर्चेला उधाण आले आहे.
सकाळच्या सत्रात मुंबईतल्या अनेक उच्चभ्रू लोकवस्तींमधील मतदार बाहेर पडले नव्हते. यामुळे मतदान नक्की कोणाच्या बाजूने होणार यावरुन तर्कवितर्क सुरू होते. पण हळू हळू मतदान वाढू लागले. मुंबईतल्या वेगवेगळ्या समाजातले मतदार मतदानासाठी बाहेर पडू लागले आहेत. मतदान वाढू लागले आहे.
मतदानाची टक्केवारी वाढू लागली असतानाच विरोधकांनी निवडणूक आयोगाकडून मतदान केलेल्यांच्या बोटाला लावली जाणारी शाई पुसली जाते असा आरोप करायला सुरुवात केली. यावर निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढून उत्तर दिले आहे. बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येणार नाही. याची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्याचे नोंद झालेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून पुन्हा मतदान करता येत नाही. मतदाराच्या बोटाला मार्कर पेनद्वारे शाई लावण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर २०११ आणि २८ नोव्हेंबर २०११ रोजी जारी केला आहे. तेव्हापासूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदाराच्या बोटाला मार्कर पेनद्वारे शाई लावली जात आहे. ही शाई बोटाला लावताना नख तसेच बोटाच्या वरच्या बाजूस त्वचेवर तीन ते चार वेळा पेन घासून शाई लावण्याचे निर्देश आहेत.
निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे विरोधकांच्या आरोपातली हवाच काढून घेतली आहे. यानंतर विरोधकांची बोलती बंद झाली आहे.