वर्षभरात २० कोटींचा दंड वसूल
मुंबई : कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी व्हावा यासाठी प्रशासनाने 'विनातिकीट' प्रवाशांविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. गेल्या वर्षभरात (२०२५) राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमांमुळे कोकण रेल्वेच्या तिजोरीत दंडापोटी तब्बल २०.२७ कोटी रुपयांची भर पडली असून ३ लाख ६८ हजारांहून अधिक अनियमित प्रवाशांना दंड ठोठावण्यात आला आहे.
केवळ डिसेंबर २०२५ या एका महिन्यात रेल्वेने ९९८ मोहिमा राबवल्या. यामध्ये ४३,८९६ फुकट्या प्रवाशांकडून २.४५ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सणासुदीच्या आणि सुट्ट्यांच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेता ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली होती.
कोकण रेल्वेवर पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळुर ते उडुपीदरम्यान धावली. रोहा – वीर – खेड – सावंतवाडी या मार्गाचे काम डिसेंबर १९९६ मध्ये पूर्ण झाले. उत्तर गोव्यामधील पेडणे येथील एका बोगद्याचे काम पूर्ण होण्यास एकूण ७ वर्षे ३ महिने कालावधी लागला. अखेर २६ जानेवारी १९९८ रोजी कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर १९९८-९९ सालापासून कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यास सुरुवात झाली. कोकण रेल्वेवरून दर आठवड्याला ४३ ते ४५ नियमित गाड्या धावतात.
याशिवाय उन्हाळी सुट्ट्या आणि गणेशोत्सवाच्या काळात चालवल्या जाणाऱ्या विशेष गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या ४ ते ५ हजारांपर्यंत जाते. अशा वेळी अधिकृत तिकीटधारकांना त्रास होऊ नये, यासाठी प्रत्येक विशेष गाडीमध्ये तपासणी पथकाद्वारे कडक चेकिंग केले जात आहे.
वर्षभरातील मोहिमेचा लेखाजोखा (जानेवारी-डिसेंबर २०२५) :
कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर या ७४० किमीच्या मार्गावर रेल्वे सुरक्षा दल आणि तिकीट तपासणी पथकाने संयुक्तपणे ही मोहीम राबवली.
एकूण कारवाया : ८,४८१ विशेष तिकीट तपासणी मोहिमा.
पकडलेले प्रवासी : ३,६८,९०१ (अनधिकृत आणि अनियमित प्रवासी).
वसूल केलेला दंड : २० कोटी २७ लाख रुपये.