वरळीच्या बीडीडी चाळीतून भरला प्रचाराचा हुंकार
मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा गाठलेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळीतील बीडीडी चाळीला भेट देऊन राजकीय वातावरण तापवले आहे. "मराठी माणसाचा विकास केला म्हणजे नक्की काय केले? गेल्या २५ वर्षांत मराठी माणसाला मुंबई सोडून बाहेर का जावे लागले?" असा सवाल करत त्यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या कार्यशैलीवर जोरदार प्रहार केला. ठाकरे बंधूंच्या भाषिक राजकारणावर टीका करताना फडणवीस म्हणाले की, "परप्रांतीयांना दोन थोबाडीत मारणे म्हणजे विकास असू शकत नाही. ठाकरे बंधूंनी मराठी विरुद्ध अमराठी असा भेदभाव करून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला, मात्र मराठी माणूस संकुचित नाही. त्याला क्षेत्रीय अस्मिता आणि भाषेचा अभिमान नक्कीच आहे, पण त्याला प्रगती हवी आहे."
मराठी आणि हिंदू वेगळं नाही
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, आमचे हिंदुत्व हे केवळ पूजा पद्धतीपुरते मर्यादित नाही. जे प्राचीन भारतीय जीवनपद्धती मानतात, ते सर्व आमच्यासाठी हिंदू आहेत. मराठी माणूस महाराष्ट्रात सुरक्षित आणि समृद्ध असावा, हेच आमचे ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बीडीडी चाळ पुनर्विकासावरून सध्या महायुती आणि उद्धव ठाकरे यांच्यात प्रचंड श्रेयवादाची लढाई सुरू आहे. अशातच मुख्यमंत्र्यांनी थेट वरळीच्या बीडीडी चाळीत जाऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी चाळीतील रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत करत त्यांचे आभार मानले. वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असल्याने मुख्यमंत्र्यांच्या या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रचाराच्या अखेरीस मुख्यमंत्र्यांनी मोठा विश्वास व्यक्त केला. "महाराष्ट्राची जनता पंतप्रधान मोदींच्या पाठीशी ठाम उभी आहे. राज्यातील २६ ते २७ महानगरपालिकांमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचाच महापौर बसेल," असा दावा त्यांनी केला.
Mumbai :मुंबईतील एका परिसरात अत्यंत संतापजनक घटना घडली असून, बोलता बोलता वाद झाल्याने एका तरुणावर त्याच्याच मित्राने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर ...
मुंबईवर झेंडा महायुतीचाच
"मुंबई महानगरपालिकेवर यंदा महायुतीचाच भगवा फडकणार असून, भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल," असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. केवळ मुंबईच नव्हे, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महत्त्वाच्या शहरांतही महायुतीचीच सत्ता येईल, असा दावा त्यांनी यावेळी केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकीवर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला. "ठाकरे बंधूंचे एकत्र येणे हा कोणताही वैचारिक 'प्रीतीसंगम' नाही, तर तो पराभवाच्या धास्तीतून निर्माण झालेला 'भीतीसंगम' आहे," असा टोला फडणवीसांनी लगावला. सत्तेसाठी आणि अस्तित्वासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याची टीका त्यांनी केली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांवर (शरद पवार आणि अजित पवार गट) टीका केली. "पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी पक्ष केवळ आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आले आहेत. मात्र, जनता आता विकासाच्या राजकारणालाच साथ देणार असून, तिथेही महायुतीच बाजी मारेल," असे फडणवीस म्हणाले. राज्यातील २७ महापालिकांच्या निवडणुकीत भाजप आपली ताकद सिद्ध करेल, असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. मुंबईत अनेक वर्षांची एकाधिकारशाही संपवून भाजप आणि मित्रपक्ष सत्ता काबीज करतील, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. निवडणुकीच्या या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.