भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या निष्काळजीपणामुळे अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकल्याचा जीव धोक्यात आला होता. खरेदीसाठी बाहेर पडताना आई-वडिलांनी आपल्या लहान मुलाला कारमध्येच ठेवले आणि काही क्षणांतच कार ऑटो लॉक झाली. परिणामी चिमुकला कारमध्ये एकटाच अडकून पडला.
थोड्या वेळाने परिसरातील नागरिकांच्या लक्षात कारमध्ये बसलेला रडणारा मुलगा आला. सुरुवातीला लोकांनी आसपास मुलाच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जोरजोरात हाका मारण्यात आल्या, मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, कारमध्ये अडकलेला चिमुकला घाबरून रडू लागला आणि परिस्थिती अधिकच गंभीर बनली. काही वेळातच कारभोवती मोठी गर्दी जमली. नागरिकांनी कारचे दरवाजे उघडण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र ते निष्फळ ठरले. वाढत्या उष्णतेमुळे आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे चिमुकल्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. याच वेळी रुग्णालयात कार्यरत असलेला निलेश नावाचा तरुण घटनास्थळी आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्याने क्षणाचाही विलंब न करता दगड उचलून कारची काच फोडण्याचा निर्णय घेतला.
निलेशने काच फोडताच लोकांच्या मदतीने चिमुकल्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आणखी 10 ते 15 मिनिटांचा उशीर झाला असता तर मुलाचा श्वास कोंडला गेला असता आणि गंभीर परिणाम झाले असते. सुदैवाने वेळेत केलेल्या धाडसी कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही वेळाने मुलाचे आई-वडील घटनास्थळी पोहोचले, मात्र जमलेल्या नागरिकांनी त्यांच्या बेजबाबदारपणावर तीव्र संताप व्यक्त केला. लोकांचा रोष वाढताना पाहून कुटुंबाने तिथून निघून जाणे पसंत केले. या घटनेनंतर पालकांनी लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत अधिक जबाबदारीने वागण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.