८ हजार भारतीय विद्यार्थ्यांवरही टांगती तलवार
नवी दिल्ली : अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर स्थलांतराला आळा घालण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, २०२५ या वर्षभरात १ लाखांहून अधिक व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये ८ हजार विद्यार्थी व्हिसांचा समावेश आहे.
२०२४ मध्ये ४० हजार व्हिसा रद्द करण्यात आले होते, मात्र २०२५ मध्ये हे प्रमाण दुपटीने वाढून १ लाखावर पोहोचले आहे. स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते टॉमी पीगॉट यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, "अमेरिकेला सुरक्षित करणे ही आमची प्राथमिकता आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना देशात स्थान नाही." तसेच पीगॉट यांनी स्पष्ट केले आहे की, ही प्रक्रिया इथेच थांबणार नाही. "अमेरिकेला सुरक्षित करण्यासाठी व्हिसा रद्द करण्याची ही मोहीम यापुढेही सुरूच राहील," असे त्यांनी नमूद केले आहे. अमेरिकन दूतावासाने ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत भारतीय विद्यार्थ्यांना इशारा दिला होता. “अमेरिकेतील कायद्यांचे उल्लंघन केल्यास विद्यार्थी व्हिसाबाबत गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. जर तुम्ही कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले किंवा तुम्हाला अटक झाली, तर तुमचा व्हिसा रद्द होऊ शकतो, तुमची अमेरिकेतून हकालपट्टी होऊ शकते, आणि तुम्ही भविष्यात यूएस व्हिसासाठी अपात्र ठरू शकता. नियमांचे पालन करा आणि तुमचा अमेरिकेतील प्रवास धोक्यात आणू नका.
कोणत्या व्हिसावर परिणाम?
विद्यार्थी व्हिसा : ८,००० व्हिसा रद्द.
विशेष व्हिसा : २,५०० व्हिसा रद्द.
या व्यतिरिक्त पर्यटक आणि व्यावसायिक व्हिसा धारकांवरही मोठी कारवाई झाली आहे.