मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची घोषणा करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आज म्हणजेच मंगळवार १४ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी चार वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद बोलावली आहे.
कोविड संकट आणि न्यायालयाच्या पातळीवर प्रलंबित असलेल्या आरक्षणाशी संबंधित याचिकांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वारंवार लांबणीवर पडत होत्या. अखेर सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्यात याव्यात असे निर्देश दिले. यानंतर राज्य निवडणूक आयोगाने टप्प्याटप्प्याने निवडणुकांची प्रक्रिया सुरू केली. आता १५ जानेवारी रोजी राज्यातील सर्व २९ महापालिकांसाठी मतदान होणार आहे. महापालिकांसाठी मतमोजणी लगेच १६ जानेवारी रोजी होणार आहे.
महापालिकांच्या निवडणुकांनंतर राज्यातल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे राज्यातल्या निवडक जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची निवडणूक अडचणीत सापडली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत सुनावणी घेतली. यावेळी राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीला न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. तर इतर सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी २१ जानेवारी रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाकडून १० फेब्रुवारीपर्यंत सर्व निवडणुका घेऊ असे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आज म्हणजेच मंगळवार १४ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी चार वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद बोलावली आहे.