ठाणे स्मार्ट व ग्लोबल शहर बनवण्याचा निर्धार
ठाणे : महायुतीने ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा जाहीर करत ठाणे शहराला स्मार्ट, सुरक्षित आणि ग्लोबल शहर बनवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. वचननाम्यात सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत परवडणारी घरे, क्लस्टर डेव्हलपमेंटद्वारे जुन्या व धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवणे, तसेच पायाभूत सुविधा बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे. आनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के, मंत्री प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, भाजप ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले, माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि विलास जोशी यांच्या उपस्थितीत वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले. आरोग्य, स्वच्छता, दवाखाने, सार्वजनिक सुविधा अधिक सक्षम करण्याचे आश्वासन देण्यात आले असून मेट्रो प्रकल्प, उड्डाणपूल, उन्नत मार्ग यांमुळे ठाण्याचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प वचननाम्यात मांडण्यात आला आहे. भविष्यात ३६० मीटर उंच लँडमार्क टॉवर, कन्व्हेन्शन सेंटर, डिजिटल युनिव्हर्सिटी, विज्ञान केंद्र, टाऊन पार्क आणि स्टेडियम उभारण्याचे नियोजन आहे.
रोजगारनिर्मिती, महिला सक्षमीकरण, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग कल्याण, प्रदूषणमुक्ती आणि पर्यावरण संवर्धन यांचा समावेश वचननाम्यात करण्यात आला आहे. एकूणच ठाणेकरांना आधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार जीवनशैली देण्यासाठी महायुतीचा हा वचननामा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.