अनेक वेळा इअरफोन किंवा इतर अॅक्सेसरीज डिस्कनेक्ट झाल्यानंतरही नागरिक ब्लुटूथ बंद करायला विसरतात. ब्लुटूथ सुरू ठेवण्यात काहीही धोका नाही, असा समज अनेकांमध्ये आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी – जसे की ट्रेन, बस, बाजारपेठ किंवा मॉल – ब्लुटूथ ऑन असल्यास सायबर गुन्हेगारांना फोनमध्ये घुसखोरी करण्याची संधी मिळते. स्कॅमर्स अज्ञात ब्लुटूथ पेअरिंग विनंत्या पाठवतात आणि चुकून त्या स्वीकारल्यास हॅकर्सना फोनमध्ये प्रवेश मिळू शकतो. एकदा फोनमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर संकेतशब्द, डेबिट-क्रेडिट कार्ड तपशील, ओटीपी आणि बँकिंग अॅप्समधील माहिती चोरणे घोटाळेबाजांसाठी सोपे होते. या माहितीच्या आधारे ते बँक खात्यातील रक्कम काढू शकतात. या प्रकारच्या फसवणुकीला ‘ब्लुजॅकिंग’ असे म्हटले जाते.
सायबर सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतेही अॅक्सेसरी कनेक्ट नसेल तर ब्लुटूथ बंद ठेवावे. सार्वजनिक ठिकाणी जाण्यापूर्वी ब्लुटूथ बंद करणे सुरक्षित ठरते. अज्ञात डिव्हाइसशी कधीही कनेक्ट होऊ नये आणि ब्लुटूथ ‘नॉन-डिस्कव्हरेबल’ मोडमध्ये ठेवावा. तसेच, मोबाईलचे सॉफ्टवेअर आणि सुरक्षा अपडेट्स नियमितपणे अपडेट ठेवावेत.