प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण
ठाणे : “कोणीही वेगळ्या पाठिंब्याची भाषा करत असेल, तर त्याला बळी पडू नका. आपला पाठिंबा फक्त आणि फक्त महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच आहे,” असा ठाम आणि स्पष्ट संदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकर मतदारांना दिला. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचार दौरा आणि जाहीर रॅलीदरम्यान ते बोलत होते. या प्रचार दौऱ्याला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांमुळे महायुतीच्या प्रचाराला मिळणारा वाढता पाठिंबा स्पष्टपणे दिसून आला. विरोधकांकडून दिशाभूल करणारे संदेश पसरवले जात असल्याचा आरोप करत, शिंदे यांनी मतदारांना कोणत्याही अफवांना बळी न पडता महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मत देण्याचे आवाहन केले.
“या निवडणुकीत केवळ उमेदवार निवडायचे नाहीत, तर ठाण्याच्या विकासाची दिशा ठरवायची आहे. त्यामुळे महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकायलाच हवा,” असे ते म्हणाले. विकासाच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे यांनी ठाम शब्दांत सांगितले की, ठाण्याच्या विकासासाठी निधीची कमतरता कधीही भासू दिली जाणार नाही. “घोडबंदरसाठी आतापर्यंत ९५० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, भविष्यात गरज भासल्यास तो आणखी वाढवला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. विकासकामांबाबत अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप करत, “काम सुरू आहे आणि ते थांबणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
ते म्हणाले, “महिला माझ्या बहिणी आहेत. त्यांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे आहे. ‘लाडकी बहीण’सह कोणतीही लोककल्याणकारी योजना बंद होणार नाही.” योजनांबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला. “महायुतीच्या अधिकृत चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. गाफील राहू नका, दिशाभूल होऊ देऊ नका,” असे आवाहन त्यांनी केले. “कमिटमेंटचं दुसरं नाव म्हणजे एकनाथ शिंदे,” असे ठाम शब्दांत सांगत त्यांनी भाषणाचा समारोप केला. यावेळी युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, शिवसेना–भाजप–रिपब्लिकन पक्षाच्या महायुतीचे सर्व उमेदवार तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.