मुंबई : "ठाकरे बंधूंना अदानींच्या प्रगतीची समस्या नसून, स्वतःची 'आमदानी' कमी झाल्याचे हे दु:ख आहे. मराठी माणसाचा केवळ वापर करून स्वतःचे इमले उभे करणाऱ्या ठाकरे बंधूंचा दुटप्पीपणा आता उघड झाला आहे," अशा तिखट शब्दांत आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरेंच्या राजकीय आणि वैयक्तिक भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले.
“गरिबांच्या घरांचे स्वप्न आम्हीच पूर्ण करणार” — मुंबई महापालिका प्रचारात शिंदेंचा थेट इशारा दहिसर, बोरीवली, मागाठाणे, कांदिवली, मालाड, दिंडोशी आणि ...
शिव उद्योग सेनेने किती रोजगार दिले?
साटम म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांमुळे देशात स्टार्टअपची लाट आली असून त्यात मराठी तरुण मोठ्या संख्येने आहेत. मात्र, ठाकरेंनी मराठी तरुणाला केवळ वडापावच्या गाडीपर्यंत मर्यादित ठेवले. "तुमच्या 'शिव उद्योग सेने'ने किती मराठी उद्योजक घडवले? केवळ इव्हेंट करायचे, पैसे गोळा करायचे आणि गायब व्हायचे हीच तुमची नीती राहिली आहे," अशी टीका त्यांनी केली.
कोहिनूर स्क्वेअर आणि मातोश्री इन्फ्रावरून निशाणा
राज ठाकरे यांच्या अदानींवरील टीकेला उत्तर देताना साटम यांनी त्यांच्या आर्थिक प्रगतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "अदानींची प्रगती कमी वेळात झाली असे म्हणता, मग तुमची प्रगती कशी झाली हे ही सांगा. जिथे मराठी गिरणी कामगार होता, तिथे 'कोहिनूर स्क्वेअर' उभे राहिले. मातोश्री इन्फ्रा आणि मातोश्री डेव्हलपर्सनी उभारलेल्या वास्तूंमध्ये किती मराठी माणसांना घरे मिळाली? कृष्णकुंज ते शिवतीर्थ हा तुमचा प्रवास कसा झाला, याचे स्पष्टीकरण द्या," असे आव्हान त्यांनी दिले.
शिक्षण आणि भाषेचा दुटप्पीपणा
मराठी भाषेच्या मुद्द्यावरूनही त्यांनी ठाकरेंना घेरले. "तुमची मुले बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकली. तिथे मराठीचा पर्याय असताना त्यांनी जर्मन आणि फ्रेंच का निवडली? आता नातवाचा प्रवेश तरी मराठी माध्यमाच्या बालमोहन शाळेत करून आपला मराठी बाणा सिद्ध करा," असा टोला साटम यांनी लगावला. तसेच, राज ठाकरे केवळ परप्रांतीयांना शिव्या देतात, पण डोंगरी-मदनपुरा भागातील अतिरेकी प्रवृत्तींविरुद्ध कधी बोलत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
उद्धव ठाकरेंवरही टीका
उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत साटम म्हणाले की, २५ वर्षे महापालिकेत सत्तेत असताना कोणी 'पापाचा पैसा' जमवला हे जनतेला माहित आहे. नोटाबंदीच्या काळात कोणाचे तळघर रिकामे झाले, हेही लपून राहिलेले नाही. राजकारणात किमान सुसंस्कृतपणा आणि तारतम्य बाळगणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी ठाकरेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.