मुंबई : विकास हाच आमचा केंद्रबिंदू असून मुंबईचा रखडलेला विकास पुन्हा वेगाने सुरू करण्यात आला. घरकुल योजना, क्लस्टर डेव्हलपमेंट, खड्डेमुक्त काँक्रीट रस्ते आणि सर्वसामान्यांच्या हिताच्या योजनांच्या माध्यमातून मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचा निर्धार महायुती सरकारने केला, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. याचवेळी त्यांनी शिवसेना, भाजप, रिपाइंच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवा, असे आवाहन मतदारांना केले. मुंबई महापालिका व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वांद्रे, वांद्रे पूर्व, विलेपार्ले आणि अंधेरी मतदारसंघातील प्रचार दौऱ्यात ते बोलत होते.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, 'कोणीही माईचा लाल आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. या योजनेमुळे बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि लखपती बनलेलं पाहणं हेच आमचं अंतिम ध्येय आहे.' युतीधर्म पाळत उमेदवारी मागे घेतलेल्या आणि महायुतीला पाठिंबा दिलेल्या नेत्यांचे शिंदे यांनी विशेष कौतुक केले. काँग्रेस आणि उबाठावर टीका करताना ते म्हणाले, 'मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला काँग्रेससह उबाठाने विरोध केला. मात्र आम्ही लाडक्या बहिणींसाठी उभे राहिलो आहोत.' विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करत शिंदे म्हणाले, '१५ तारखेपर्यंत गाफील राहू नका. प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. महायुतीच्या विजयासाठी सर्वांनी एकजुटीने, ताकदीने काम करा.' शेवटी त्यांनी मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत,' तुमच्या प्रेमळ आशीर्वादामुळेच आम्ही हा संघर्ष उभा करू शकलो. तुमचे योगदान कायम लक्षात ठेवले,' असे भावनिक उद्गार काढले. यानंतर अंधेरी मतदारसंघातील प्रचार दौऱ्यात शिंदे यांनी क्लस्टर डेव्हलपमेंटचा मुद्दा उपस्थित करत सर्वसामान्य मुंबईकरांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. 'विकास करायचा असेल, तर शिवसेना आणि महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणा,' असे आवाहन त्यांनी केले. गिरणी कामगारांना घरे देण्यात आली असून ही प्रक्रिया आजही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत मोठ्या प्रमाणावर काँक्रीट रस्त्यांची निर्मिती होत असून त्यामुळे शहर खड्डेमुक्त होईल. यावेळी माजी मंत्री दीपक सावंत, आमदार मुरजी पटेल, आमदार भावना गवळी, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.