मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या बनवताना दुबार मतदारांचा शोध घेण्यात येत असून तब्बल १ लाख ६५ हजार दुबार मतदारांपैंकी ४८ हजार दुबार मतदारांनी आपले परिशिष्ट दोन लिहून दिले आहे. त्यामुळे त्यांनी लिहून दिलेल्या मतदान केंद्रात त्यांना मतदान करता येणार असून त्यांच्या नावासमोरील स्टार काढून टाकण्यात आला आहे. तसेच ज्यांनी परिशिष्ट दोन भरुन दिले नसल्यास त्यांना मतदान केंद्रावर दोन पुरावे सादर करणारी ओळखपत्रे आणि परिशिष्ट दोन भरुन दिल्यावर मतदानाचा अधिकार दिला जाईल,असे महापालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील दुबार मतदारांच्यासंदर्भातील सर्व प्रकारची प्रक्रिया पूर्ण करून ११ लाख १ हजार ५०६ दुबार मतदारांपैंकी केवळ १ लाख ६५ हजार निव्वळ दुबार मतदार आढळून आले आहेत. त्या सर्व दुबार मतदारांची घरोघरी जावून स्थळ पाहणी करून त्यांच्याकडून मतदान कुठे करणार याची माहिती जाणून घेतली. यानुसार तब्बल ४८ हजार ६२८ दुबार मतदारांनी परिशिष्ट दोन सादर करून आपण कुठल्या मतदान केंद्रात मतदान करणार याची माहिती दिली आहे. त्यानुसार त्यांच्या नावासमोरील स्टार काढून टाकण्यात आला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी दिली आहे.
परिशिष्ट दोन सादर करणाऱ्या मतदारांच्या नावासमोर शिक्के मारुन त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. परंतु ज्या दुबार मतदारांनी परिशिष्ट दोन भरुन दिले नाही आणि ते जर मतदान करण्यासाठी आले तर त्यांच्याकडून दोन ओळखपत्र पुरावे म्हणून स्वीकारुन त्यांच्याकडून परिशिष्ट दोन भरुन घेतले जाईल आणि त्यानंतर त्यांना मतदानाचा अधिकार दिला जाईल. याबाबत पीआरओंना योग्यप्रकारचे प्रशिक्षण दिले असून याबाबत कुणाकडून हुज्जत घालण्याचा प्रकार घडणार नाही असाही विश्वास व्यक्त केला
दुबार मतदारांसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधान करत अशाप्रकारचे दुबार मतदार मतदान करण्यास आल्यास त्यांच्या तोडून काढा असे म्हटले आहे. यासंदर्भात बोलतांना डॉ भूषण गगराणी यांनी यासंदर्भात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे अशाप्रकारची घटना घडण्याची शक्यता नसेल तरीही आमची यंत्रणा यासाठी सज्ज आणि अलर्ट असेल असेही त्यांनी स्पष्ट केल,
मोबाईल बंदी कायम, पण पूर्णपणे बंद करून मतदान केंद्रात नेता येवू शकतो
मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली होती, ती बंदी याही निवडणुकीत कायम आहे.मतदान केंद्रात मोबाईल नेता येईल किंवा नाही याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या कोणत्याही सूचना नसल्याने मागील निवडणुकीप्रमाणे यंदाच्या महापालिका निवडणुकीतही तेच नियम कायम आहेत. मतदान केंद्रात मोबाईल फोन नेता येणार नाही. परंतु जर आप मोबाईल फाेन जवळ बाळगणार असाल तर तो पूर्णपणे बंद करून खिशात किंवा पर्समध्ये टाकून नेवू शकता असेही महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.