मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी पुढे कोण सोबत राहील आणि कोण सोडून जाईल याची भीती त्यांना आजही सतावत आहेत. आज मनसे आणि उबाठा यांची युती झाल्याने अनेक नाराज झाले आणि पक्ष सोडून गेले. त्या पक्ष सोडून गेलेल्यांची राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली. आपलेच आहेत,परत येतील, असे सांगतानाच राज ठाकरे यांनी आता जे आहेत ते कुठे जातील ते माहित नाही, असे सांगत भविष्यात सोबत असणारेही सोडून जातील अशीच अप्रत्यक्ष भीती व्यक्त केली.
उबाठा, मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबई महापालिका निवडणुकीची जाहीर सभा दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्यावर आवाज उठवल्याबद्दल अनेक सामाजिक संस्था आहे, त्यांचे नेते. वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्र यांचे संपादक तसेच पत्रकार यांचे आभार मानले. २० वर्षानंतर प्रथमच मी युती करतो. युतीच्या प्रोसेसमध्ये अनेकांची मने दुखावली गेली. अनेक नाराज झाले, काहींना वाईट वाटले ते दुसऱ्या पक्षात गेले. पण आमच्याही हातात नसतात या गोष्टी. त्यांना दुखावणे हा आमचा हेतू नव्हता. त्यामुळे मी त्याची, दिलगिरी व्यक्त करतो असे सांगत त्यांनी एकप्रकारे माफी मागितली. जे सोडून गेले ते आपलेच आहेत. परत येतील. आता आहेत ते कुठे जातील तेही माहित नाही, त्यांना समजू शकतो,असे सांगत एकप्रकारे राज ठाकरे यांनी भिती व्यक्त केली.
मागील काही दिवसात, स्नेहल जाधव,राजा चौगुले, संतोष धुरी, संतोष नलावडे, ढवळे, आदी पक्ष सोडून गेले असून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे हेही नाराज असून तेही पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच जाहीर सभेत देशपांडे यांना भाषण करण्याची संधी दिली. आणि देशपांडे व्यासपीठावर असताना राज ठाकरे यांचे वक्तव्य म्हणजे एकप्रकारे देशपांडे यांनाच उद्देशून अप्रत्यक्ष तर बोलले नाही ना असा प्रश्न मनसैनिक आणि उबाठाच्या शिवसैनिकांना पडला आहे.