उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी प्रथमच मराठी आणि सिंधी समाज एकत्र येत ‘दोस्ती का महागठबंधन’ उभे राहिले असून, याच आघाडीचा महापौर होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा ठाम विश्वास शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
शहरातील गोलमैदान येथे आयोजित शिवसेना–टीओके (ओमी कलानी), साई पक्ष (जीवन इदनानी), रिपाइं आठवले गट, पीआरपी (प्रा. जोगेंद्र कवाडे) आणि रिपब्लिकन सेना (आनंदराज आंबेडकर) यांच्या ‘दोस्ती का गठबंधन’च्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. विकास हाच आमचा एकमेव अजेंडा असून, तो फास्टट्रॅकवर राबवला जाईल, असा निर्धारही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. सभेत शिंदे यांनी मराठी आणि सिंधी समाजातील सांस्कृतिक एकतेवर भाष्य करताना, “सिंधी बांधवांचा दाल-पक्वान आणि मराठी बांधवांचा वडापाव यांची युती झाली आहे,” असे म्हणत सभागृहात हास्यकल्लोळ निर्माण केला.
आपल्या कार्यकाळाबाबत बोलताना शिंदे म्हणाले, “अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री काळात अडीच तासही शांत झोप घेतली नाही. कारण काहींच्या झोपा उडवण्यासाठीच मी काम करत होतो,” असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी विरोधकांना लगावला. उल्हासनगरमध्ये सध्या कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू असून, आणखी अनेक योजना लवकरच राबवण्यात येणार आहेत. विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन देत, ठाण्याच्या धर्तीवर क्लस्टर विकास योजना उल्हासनगरमध्ये राबविण्यात येणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी केली.
या सभेला माजी आमदार पप्पू कलानी, साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी, टीओकेचे प्रमुख ओमी कलानी, उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख राजेंद्रसिंग भुल्लर, पीआरपीचे जयदीप कवाडे, माजी महापौर लीलाबाई आशान, आशा इदनानी, पंचम कलानी, टीओकेचे कमलेश निकम, मनोज लासी, जमनू पूरस्वानी, महेश सुखरामानी, प्रकाश माखिजा यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते.