संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात
बोईसर : पालघर तालुक्यातील दांडी गावात मुले पळवणारी टोळी आल्याच्या संशयावरून ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले होते. मात्र, पालघर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत संशयितांना ताब्यात घेतल्याने एक मोठा अनर्थ रोखण्यात पोलिसांना यश आले. शुक्रवारी सकाळी दांडी गावात एका रिक्षामधून दोन पुरुष आणि एक महिला ब्लँकेट विकण्यासाठी आले होते.
ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उभे असताना, हे अनोळखी लोक आपल्या मोबाईलमधून शाळकरी मुलींचे गुपचूप फोटो काढत असल्याचा संशय काही मुलींना आला. मुलींनी ही माहिती तातडीने आपल्या पालकांना दिली. गावकऱ्यांनी या संशयित व्यक्तींच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्यामध्ये लहान मुलींचे फोटो आढळले. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आणि 'मुले पळवणारी टोळी' आल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. पाहता पाहता ग्रामस्थांचा मोठा जमाव तिथे गोळा झाला. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच जागरूक नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनायक नरळे, विभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, सातपाटीचे पोलीस निरीक्षक उदय सुर्वे आणि तारापूरचे पोलीस निरीक्षक निवास कणसे आपल्या पथकासह तातडीने दांडी गावात दाखल झाले. पोलिसांनी संतप्त जमावाची समजूत काढली आणि त्या तीन संशयित व्यक्तींना आपल्या ताब्यात घेतले.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून कारवाई केल्यामुळे जमावाचा रोष शांत झाला. सध्या पोलीस या तिघांची कसून चौकशी करत आहेत. "कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि संशयास्पद व्यक्ती आढळल्यास स्वतः कायदा हातात न घेता पोलिसांना कळवा," असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.