सत्ता काळात दुर्लक्ष, निवडणूक जवळ येताच उबाठाला झाली आठवण
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील नेत्यांच्या आठवणी भावी पिढीला अवगत व्हाव्यात यासाठी महापालिकेच्यावतीने दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन बनवले . परंतु बाळासाहेबांनी तब्बल १५ वर्षांपूर्वी बनवलेल्या या स्मृतीदालनाकडे सत्ता असतानाही कधीही ढुंकूनही न पाहणाऱ्या उबाठाला आता निवडणूक आल्यावर आठवण झाली. या स्मृती दालनाची दुरवस्था झाल्याचे वारंवार निदर्शनास आणून दिल्यानंतरही दुर्लक्ष करणाऱ्या उबाठाने येणाऱ्या निवडणुकीच्या वचननाम्यात याचे नुतनीकरण करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्याचा प्रयत्न केला आहे.
विशेष म्हणजे या स्मृती दालनाच्या वरील मजल्यावर उबाठा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काढलेल्या विहंग छायाचित्राचे प्रदर्शन कायमस्वरुपी भरवलेले आहे. त्यामुळे आपल्या छायाचित्रांची योग्य काळजी घेण्यासाठी याचे नुतनीकरण केले जाते की स्मृती दालनाची काळजी आहे म्हणून केली जाणार आहे असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे.
छत्रपती शिवाजी पार्क येथील संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचे नुतनीकरण करण्याचे आश्वासन देतानाच ठाकरेंनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मुंबई आणि महाराष्ट्राचे योगदान अधोरेखित करणारे स्वातंत्र्य समर स्मृतीदालन उभारण्याची घोषणा केली. परंतु ज्यांना बाळासाहेबांनी पुढाकार घेवून बनवलेल्या स्मृती दालनाची काळजी आणि देखभाल करता आलेली नाही, त्यांना स्वातंत्र्य समर स्मृतीदालनाची उभारणी करून संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाप्रमाणे त्याची दुरवस्था करायची आहे का असा सवाल जनतेच्या मनात निर्माण व्हायला लागला आहे. .
टेक्सटाईल म्युझियम नऊ वर्षांनंतरही खुले होईना
मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या काळात काळाचौकी येथे टेक्सटाईल म्युझियमचे काम हाती घेण्यात आले आहे . सर्व प्रकारच्या मंजुरीनंतर सन २०१७मध्ये या टेक्सटाईल म्युझियमच्या कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु आज साडेआठ ते नऊ वर्षे उलटत आली तरी या म्युझियमचे काम पूर्ण न झाल्याने अद्यापही पर्यटकांसाठी ते खुले होवू शकलेले नाही. दुसरीकडे कापड गिरण्या ते आय टी हब हा प्रवास तसेच मुंबईला घडवण्यात मोठा वाटा असलेल्या उद्योजकांच्या योगदानाचे दर्शन घडवणारे अत्याधुनिक मुंबई म्युझियमची घोषणा करून येणाऱ्या काळात सुरु होणाऱ्या टेक्स्टाईल म्युझियमनच्या नावाखाली आम्ही करून दाखवले असे सांगत मोकळे होणार आहेत.