सातारा : नियतीचा खेळ कधी किती निर्दयी ठरेल, याचा प्रत्यय सातारा जिल्ह्यातील एका हृदयद्रावक घटनेतून आला आहे. भारतीय सैन्यात सेवा बजावणारे जवान प्रमोद परशुराम जाधव हे काही दिवसांच्या रजेवर गावी आले असताना भीषण अपघातात दगावले. विशेष बाब म्हणजे, ज्या क्षणी त्यांच्या घरात नव्या जीवाच्या आगमनाची तयारी सुरू होती, त्याच वेळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
सातारा तालुक्यातील दरे गावचे रहिवासी असलेले प्रमोद जाधव सैन्य दलात कार्यरत होते. पत्नीच्या प्रसूतीसाठी ते काही दिवसांपूर्वीच रजा घेऊन गावी आले होते. आईचे छत्र आधीच हरपलेले असल्याने, पत्नीच्या या महत्त्वाच्या काळात तिच्या सोबत राहण्याचा त्यांचा निर्धार होता.
शनिवारी सकाळच्या सुमारास काही वैयक्तिक कामासाठी प्रमोद जाधव दुचाकीवरून जात असताना, वाढे फाट्याजवळ एका मालवाहू वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.
या दुर्घटनेने संपूर्ण दरे गाव शोकसागरात बुडाले. सर्वात हृदय पिळवटून टाकणारी बाब म्हणजे, प्रमोद यांचे पार्थिव गावी आणले जात असतानाच त्यांच्या पत्नीने एका गोंडस कन्येला जन्म दिला. एका बाजूला नव्या आयुष्याचे स्वागत, तर दुसऱ्या बाजूला घरच्या कर्त्या व्यक्तीचा अंत या घटनेमुळे प्रत्येकाचे डोळे पाणावले. जन्माच्या काही तासांतच त्या चिमुकलीला आपल्या वडिलांचे अंतिम दर्शन घ्यावे लागले. पित्याच्या छायेशिवाय सुरू झालेलं तिचं आयुष्य अनेकांना सुन्न करून गेलं.
शनिवारी दुपारी दरे गावात प्रमोद जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. अंत्यविधीच्या वेळी जेव्हा त्यांच्या पत्नीला आणि नवजात बालिकेला तिथे आणण्यात आले, तेव्हा उपस्थित प्रत्येकाचा संयम ढासळला. प्रमोद जाधव यांच्या पश्चात वडील, पत्नी आणि नवजात कन्या असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण सातारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.