रायगड : हिंदवी स्वराज्याची राजधानी,छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवशाली परंपरेला जपणारं किल्ले रायगड आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नव्या रूपात उजळणार आहे. बहुप्रतिक्षित 'लाईट अँड साऊंड शो'येत्या काही दिवसांत किल्ले रायगडावर सुरू होणार आहे.देशातील पहिलाच ३६० अंशांचा लाईट अँड साऊंड शो रायगडावर उभारला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी आज किल्ले रायगडावर प्रत्यक्ष भेट देत कामांची पाहणी केली.
लाईट अँड साऊंड शोसाठी उभारण्यात येणारी प्रकाशयोजना, स्पॉटलाईट्स, साऊंड सिस्टिम, कंट्रोल यंत्रणा, त्याचसोबत गडावरील विविध ऐतिहासिक स्थळाचा समावेश केला जाणार आहे. ४५ मिनिटांच्या या शो मध्ये बाजारपेठ, होळीचा माळ, नगारखाना, राजसदर, जगदीश्वर मंदिर, शिवसमाधी स्थळासह गडावरील इतर शिवकालीन वास्तू,मावळ्यांचे पराक्रम,शिवराज्याभिषेक सोहळा,तसेच स्वराज्याची उभारणी या सर्व ऐतिहासिक क्षणांना प्रकाश आणि ध्वनी प्रभावातून जिवंत केले जाणार आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून का होतेय टीका?
परंतु, दुसरीकडे सोशल मीडियावर रायगड प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या जतन आणि संवर्धन कामांवर टीका केली जात आहे.लौकिक गोळे नावाच्या तरुणाने सोशल मीडियावर रिल्स पोस्ट करत किल्ले रायगडावरील काही पायऱ्या आणि भिंतींचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला आहे.या रिल्समध्ये सहज निखळणारे दगड, दगडांच्या जॉईंटमध्ये भरलेली माती,तसेच ऐतिहासिक स्वरूपाला धक्का लावणारे काम सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओंमुळे इतिहासप्रेमी आणि शिवभक्तांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
एकीकडे रायगडावर इतिहास जिवंत करणारा भव्य लाईट अँड साऊंड शो सुरू होण्याच्या तयारीत आहे,तर दुसरीकडे प्राधिकरणाच्या कामांवरून वाद निर्माण झाला आहे.त्यामुळे येत्या काळात रायगडावरील विकासकामे, जतन प्रक्रिया आणि पारदर्शकता याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.छत्रपती संभाजी राजे यांनी किल्ले रायगडावर सुरू असलेल्या रायगड प्राधिकरण विकासाच्या मार्फत कामांचा आढावा घेतला. छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली. सरकारने याकडे विशेष लक्ष देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.