भ्रष्टाचाराच्या आरोपांनी नाईक आक्रमक
नवी मुंबई : आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी सभेत भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी आक्रमक भूमिका घेत थेट इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एका सार्वजनिक सभेत बोलताना गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. “कोणी उन्माद केला, तर तो मोडून काढण्याची ताकद आमच्याकडे आहे,” असे म्हणत त्यांनी इशाराच दिला. पुढे बोलताना नाईक म्हणाले, “टांगा उलटेल आणि घोडे फरार होतील,” तसेच “वेळ आली तर घोडेच बेपत्ता होतील,” अशा टोकदार शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या वक्तव्यामुळे महायुतीतील तणाव अधिकच स्पष्ट झाला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर संघर्ष तीव्र : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गट दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, जागावाटप, स्थानिक नेतृत्व आणि राजकीय वर्चस्वावरून गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये धुसफूस सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर नाईक समर्थक अस्वस्थ झाले असून, त्यातूनच हा संघर्ष उघडपणे समोर आल्याचे चित्र आहे.
महायुतीसाठी डोकेदुखी : राजकीय विश्लेषकांच्या मते, हा वाद केवळ शाब्दिक मर्यादेत राहणारा नाही. नवी मुंबईत सत्तेत वर्चस्वासाठीची ही लढाई असून, गणेश नाईक यांचे वक्तव्य भाजपमधील त्यांच्या ताकदीचे दर्शन घडवते. शिंदे गटही शहरात राजकीय पकडीसाठी प्रयत्नशील आहे. संघर्षाचा फटका महायुतीच्या मतांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.