Mumbai Goregoan Fire : गोरेगाव हादरले! एका ठिणगीने संपवलं हसतं-खेळतं कुटुंब; आगीच्या भीषण ज्वाळांमध्ये तिघांचा होरपळून मृत्यू

मुंबई : मुंबईतील गोरेगाव पश्चिम परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास येथील भगतसिंग नगरमधील एका घराला भीषण आग लागली. या आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे घरात गाढ झोपेत असलेल्या एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.



नेमकी कशामुळे लागली आग ?


मिळालेल्या माहितीनुसार, ही आग एका 'ग्राउंड प्लस वन' (तळमजला अधिक एक मजला) रचनेच्या घरात लागली होती. घराच्या तळमजल्यावरील इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही आग लागली आणि काही क्षणातच या आगीने संपूर्ण घराला कचाट्यात घेतले. तळमजल्यावर शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागलेली आग तिथे असलेल्या घरगुती साहित्यापर्यंत पोहोचली. दुर्दैवाने, पहिल्या मजल्यावर कपड्यांचा मोठा साठा होता. आगीच्या ज्वाळा जेव्हा वरच्या मजल्यापर्यंत पोहोचल्या, तेव्हा कपड्यांनी तातडीने पेट घेतल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. ज्यावेळी हा सर्व प्रकार घडला, तेव्हा घरातील तिन्ही सदस्य गाढ झोपेत होते. आगीने घराला चहुबाजूंनी वेढल्यामुळे आणि धुराचे लोट साचल्यामुळे त्यांना जीव वाचवण्यासाठी बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. आगीची भीषणता पाहून परिसरातील नागरिक तात्काळ मदतीला धावले. मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत स्थानिक रहिवाशांनी एकजुटीने पाऊल उचलले. त्यांनी घराघरातून पाण्याच्या बादल्या आणून आगीवर मारा करण्यास सुरुवात केली. आपल्या जीवाची पर्वा न करता रहिवाशांनी आग आटोक्यात आणण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, मात्र आगीच्या तीव्रतेपुढे त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. अखेर अग्निशमन दलाने पोहोचून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले, परंतु तोपर्यंत एकाच कुटुंबातील तिघांचा करुण अंत झाला होता.



तिघांचाही होरपळून मृत्यू


गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंग नगरमध्ये लागलेल्या भीषण आगीने एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा अंत केला आहे. या आगीत संजोग पावसकर (४८), त्यांची १९ वर्षांची मुलगी हर्षदा आणि अवघ्या १२ वर्षांचा मुलगा कुशल या तिघांचाही होरपळून मृत्यू झाला. पहाटेच्या वेळी गाढ झोपेत असताना लागलेल्या या आगीमुळे पावसकर कुटुंबाला सावरण्याची संधीच मिळाली नाही. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी प्रथम परिसराचा वीजपुरवठा खंडित केला आणि आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. पहाटे ३ वाजून ६ मिनिटांनी लागलेली ही आग जवानांनी अथक प्रयत्नांनंतर अवघ्या १० मिनिटांत, म्हणजेच ३ वाजून १६ मिनिटांनी पूर्णतः विझवली. मात्र, या अवघ्या काही मिनिटांच्या अग्नीतांडवाने पावसकर कुटुंबाचा घात केला होता. जवानांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत असलेल्या संजोग, हर्षदा आणि कुशल यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने पोलीस आणि खासगी वाहनांच्या मदतीने गोरेगाव येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे उपस्थित असलेले आरएमओ डॉ. मोईन यांनी तपासणीअंती तिघांनाही 'मृत' घोषित केले. तिघेही भीषणरीत्या भाजले गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण गोरेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील बाप आणि दोन मुलांचा अशा प्रकारे अंत झाल्याने स्थानिक नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. प्राथमिक तपासात घराच्या विद्युत वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, अग्निशमन दल आणि पोलीस या प्रकरणाची सविस्तर चौकशी करत असून आगीचे नेमके तांत्रिक कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Comments
Add Comment

टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी धावपटू सज्ज

मुंबई : आशियातील सर्वात मानाची आणि जगातील अव्वल मॅरेथॉनपैकी एक असलेली 'टाटा मुंबई मॅरेथॉन' यंदा २१ व्या वर्षात

महापालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक विभाग, पर्यटन विभागाची स्थापना

महायुतीने दिला मुंबईतील मतदारांना शब्द मुंबई : मुंबईची संस्कृती, कला व वारसा जतन व प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई

मंत्री नितेश राणे यांच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर

जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा ‘कोर्टा’च्या कचाट्यात

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे लक्ष मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या

'मुंबईला जागतिक दर्जाचे शहर करणार'

मुंबई : विकास हाच आमचा केंद्रबिंदू असून मुंबईचा रखडलेला विकास पुन्हा वेगाने सुरू करण्यात आला. घरकुल योजना,

वर्षभरात मुंबई ‘बांगलादेशीमुक्त’ करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : 'मुंबईत अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या सर्व बांगलादेशी नागरिकांना शोधून काढून येत्या येत्या वर्षभरात