ही सुविधा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मार्फत विकसित करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये या इंटरचेंजचे कमिशनिंग करण्यात आले होते. आवश्यक CMRS सुरक्षा चाचण्या पूर्ण झाल्यानंतर आता फेज 1 पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला आहे. दहिसर पूर्व मेट्रो स्थानकाच्या उत्तरेकडील टोकाला उभारण्यात आलेल्या या इंटरचेंजमुळे मेट्रो लाईन 7, मेट्रो लाईन 2A आणि मेट्रो लाईन 9 (फेज 1) एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत.या नव्या सुविधेमुळे दहिसर ते अंधेरी तसेच मिरा-भाईंदर ते मुंबईच्या मध्यवर्ती भागांपर्यंतचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर झाला आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे आता मेट्रो लाईन 1 आणि मेट्रो लाईन 7 दरम्यानही थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली आहे.
मेट्रो लाईन 9 चा फेज 1 हा 4.5 किलोमीटर लांबीचा असून दहिसर पूर्व, पांडुरंग वाडी, मिरागाव आणि काशिगाव या चार स्थानकांचा समावेश आहे. या सेवेमुळे मिरा-भाईंदरमधील प्रवासी काशिगाव येथून मेट्रोत प्रवेश करून कोणतीही मेट्रो बदलण्याची गरज न पडता थेट अंधेरीपर्यंत प्रवास करू शकणार आहेत. या बदलामुळे मिरा रोड ते अंधेरी या प्रवासाला दीड तास लागत होते पण आता तोच प्रवास, 50 मिनिटांपेक्षा कमी झाला आहे. परिणामी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे व दहिसर टोलनाक्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, अधिकाधिक प्रवासी मेट्रोकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.