अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या कारवाईचा शिवसेनेला फटका; भाजपची मुसंडी

रवींद्र चव्हाणांनी २४ तासांत सूत्रे हलवली


अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेतील सत्तासंघर्षाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. भाजप–काँग्रेस युतीमुळे सुरू झालेल्या राजकीय भूकंपानंतर अवघ्या २४ तासांत भाजपने संपूर्ण चित्र पालटून टाकले, तर काँग्रेस अक्षरशः रिकामी झाली आहे. या घडामोडी शिवसेनेसाठी (शिंदे गट) धोक्याची घंटा मानली जात आहे. अंबरनाथ नगरपालिकेत भाजप आणि काँग्रेसच्या अनपेक्षित युतीची सर्वत्र चर्चा रंगली होती. या निर्णयावर काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाने तीव्र नाराजी व्यक्त करत सर्व १२ नगरसेवकांना निलंबित केले, तर अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घडामोडींवर नाराजी व्यक्त केली होती.


निलंबनानंतर २४ तासही उलटत नाहीत तोच काँग्रेसचे सर्व १२ नगरसेवक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. अंबरनाथमधील काँग्रेस पूर्णपणे संपुष्टात आली असून, भाजपचे संख्याबळ लक्षणीयरीत्या वाढले आहे.


चव्हाणांचा टॉप गियर; २०२९ ची तयारी:


भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रविंद्र चव्हाण यांनी संघटनात्मक ताकदीवर भर दिला. कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचे (शिंदे गट) अनेक पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाले. खा. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय दिपेश म्हात्रे यांनीही कमळ हाती घेतले. भाजप आणि श्रीकांत शिंदे यांच्यातील तणाव जुना असून, २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती, अशी चर्चा होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ठाण्यात भाजप बॅकफूटवर गेली होती; २०२४ नंतर चित्र बदलले. चव्हाणांकडे प्रदेशाध्यक्षपद आले. चव्हाण यांनी पक्षप्रवेशांचा सपाटा लावत शिवसेनेची (शिंदे गट) राजकीय कोंडी सुरू केली आहे. अंबरनाथ, बदलापूरसारख्या पारंपरिक शिवसेना गडांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष झाले, ठाणे जिल्ह्यात सत्तासंतुलन वेगाने बदलत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, २०२९ च्या निवडणुकांसाठी भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असून, चव्हाणांनी टाकलेला ‘टॉप गियर’ शिवसेनेसाठी (शिंदे गट) वर्तमानातच नव्हे, तर भविष्यातही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.


संख्याबळात बदल, शिवसेनेची (शिंदे गट) कोंडी


अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेसेनेने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या होत्या. भाजपला १४, काँग्रेसला १२, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळाल्या. भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले होते. मात्र आता १२ नगरसेवक भाजपमध्ये आल्याने सत्तासमीकरण पूर्णपणे बदलले आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असतानाही भाजपने नगराध्यक्षपद मिळवले असून, नव्या पक्षप्रवेशांमुळे शिवसेनेला (शिंदे गट) उपनगराध्यक्षपद व समित्यांवरील दावा कमजोर झाला आहे.

Comments
Add Comment

शिवसेनेत गेलेल्या माजी नगरसेविकेची २४ तासांत भाजपमध्ये घरवापसी

मीरा-भाईंदर : उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या मीरा रोड येथील भाजपच्या माजी नगरसेविका अनिता मुखर्जी यांनी

राज्यातील सर्व महापालिकांवर महायुतीचाच महापौर!

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा विश्वास ठाणे : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी

कल्याणमध्ये उबाठाला मोठा झटका

अधिकृत उमेदवाराचा शिवसेनेत प्रवेश कल्याण : महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, प्रचार अंतिम

खारघर-कामोठ्यात कमी दाबाने पाणीपुरवठा

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीत गळती आढळून

राबोडीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने-सामने

जितेंद्र आव्हाडांच्या प्रचारावेळी अजित पवार गटाचे शक्तिप्रदर्शन ठाणे : ठाण्यातील राबोडी परिसरात बुधवारी

कुणाच्याही भूलथापांना, दबावाला बळी पडू नका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन नवी मुंबई : कुणाच्याही भुलथापा वा दबावाला बळी पडण्याचे कोणतेही कारण नाही.