जितेंद्र आव्हाडांच्या प्रचारावेळी अजित पवार गटाचे शक्तिप्रदर्शन
ठाणे : ठाण्यातील राबोडी परिसरात बुधवारी मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी झाल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड प्रचारासाठी राबोडीत दाखल झाले असताना, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र आव्हाड हे आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी परिसरात फिरत असतानाच, समोरून आलेल्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यामुळे दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. या घोषणाबाजीद्वारे आव्हाड यांना जाणीवपूर्वक डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही हाणामारी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
निवडणूक पार्श्वभूमीवर अंतर्गत वाद उफाळला
आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचाराला वेग आला असून, विविध पक्षांकडून शक्तिप्रदर्शन वाढताना दिसत आहे. राबोडीतील या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष थेट रस्त्यावर उतरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ठाणे महापालिका निवडणूक आव्हाडांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर तसेच त्यांच्या काही निकटवर्तीयांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आव्हाड यांची संघटनात्मक ताकद काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे कळवा–मुंब्रा पट्ट्यात अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी आव्हाड जोरदार प्रयत्न करत असल्याचे सांगितले जाते.