ठाणे : ठाणे पालिका निवडणुकीत मागील काही निवडणुकांप्रमाणे यंदाही काही कुटुंबे निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. त्यात काही संपूर्ण कुटुंबच, तर काही ठिकाणी पती, पत्नी, वडील आणि मुलगी, वहिनी, दीर, दोन भाऊ आणि पत्नी, आई आणि मुलगा असे काही दिग्गज चेहरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातही शिंदेसेनेमधीलच अधिक उमेदवारांनी आपल्या घरच्यांना तिकीट मिळविण्यात आघाडी घेतली.
ठाण्यातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये देवराम भोईर यांच्यासह त्यांचा मुलगा संजय भोईर, सून उषा भोईर आणि दुसरी सून सपना भोईर हे कुटुंबीय शिंदेसेनेच्या तिकिटावर आपले नशीब आजमावत आहेत, तर पक्षाने तिकीट नाकारल्याने देवराम यांचा दुसरा मुलगा भूषण याने प्रभाग क्रमांक ३ मधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.
अशीच काहीशी परिस्थिती प्रभाग क्रमांक १ मध्ये असून त्याठिकाणी शिंदेसेनेकडून रवी घरत यांच्या पत्नी नम्रता घरत यांना उमेदवारी दिली; परंतु रवी यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. वागळे पट्यात एकनाथ भोईर यांची पत्नी एकता भोईर, त्यांची सून यज्ञा भोईर, योगेश जानकर आणि त्यांच्या पत्नी दर्शना हेही शिंदेसेनेकडून उतरले आहेत. माजी आ. रवींद्र फाटक यांची पत्नी जयश्री फाटक व त्यांचे दीर राजेंद्र फाटक हे रिंगणात आहेत. दिव्यातून रमाकांत मढवी, त्यांची मुलगी साक्षी मढवी हे नशीब आजमावत आहेत. शिंदेसेनेचे मिलिंद पाटील, त्यांच्या पत्नी मनाली पाटील, मंदार केणी हे शिंदेसेनेतून, तर त्यांच्या आई प्रमिला केणी या अपक्ष निवडणूक लढवत आहेत.