पालघर : पालघर जिल्ह्याच्या राजकारणात नगर परिषद निवडणुकीनंतरचे नवे पर्व सुरू झाले आहे. पालघर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी निवडून आलेले उत्तम घरत आणि डहाणू नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवडून आलेले राजेंद्र माच्छी यांनी थाटात आणि शक्तिप्रदर्शनासह आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
पालघरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष उत्तम घरत यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी शहरात भव्य रॅली काढत शक्तिप्रदर्शन केले. पदभार स्वीकारल्यानंतर नगर परिषद मुख्यालय परिसरात शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.
"पालघर शहराचा विकास झपाट्याने होत आहे, मात्र वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या ही चिंतेची बाब आहे. शहराला या समस्येतून मुक्त करण्याला माझे पहिले प्राधान्य असेल," असे प्रतिपादन उत्तम घरत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केले. या सोहळ्याला शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित, जिल्हाप्रमुख कुंदन संखे, नवनिर्वाचित नगरसेवक आणि जिल्हाभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार गावित यांनी शहराच्या सुनियोजित विकासासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
तर डहाणू नगर परिषदेला पुन्हा एकदा जनतेतून थेट निवडून आलेले खंबीर नेतृत्व लाभले आहे. राजेंद्र माच्छी यांनी अधिकृतपणे नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. डहाणूतील या सत्ताबदलावर बोलताना जिल्हाप्रमुख कुंदन संखे म्हणाले की, "डहाणूतून अहंकाराचे राजकारण जनतेने हद्दपार केले आहे. आता केवळ सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आणि शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जाईल." या सोहळ्याप्रसंगी माजी आमदार आनंद ठाकूर, आमदार राजेंद्र गावित आणि शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
डहाणूचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नवे नेतृत्व प्रामाणिकपणे काम करेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. पालघर आणि डहाणू या दोन्ही महत्त्वाच्या शहरांमध्ये आता विकासाचे नवे वारे वाहू लागल्याने नागरिकांच्या अपेक्षा
उंचावल्या आहेत.