मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बेस्ट समितीचे अध्यक्षपद भूषवलेले दोन माजी नगरसेवक यंदा पालिका निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. वार्ड क्रमांक २०६ मधून नाना आंबोले, तर वार्ड क्रमांक २०४ मधून अनिल कोकीळ हे उभे आहेत. दोघेही शिवसेना शिंदे गटाकडून उभे असून, अखंड शिवसेनेमधून त्यांनी बेस्ट समिती अध्यक्षपद भूषवली होते. नाना आंबोले यांनी २०१५-१७ व अनिल कोकीळ हे २०१७ - १८ दरम्यान बेस्ट समिती अध्यक्ष होते. आज बेस्ट उपक्रमाची अवस्था अत्यंत वाईट झाली असून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत. तसेच खासगीकरणामुळे ही बेस्ट मोठ्या प्रमाणात तोट्यात गेली आहे. अशाच बेस्ट उपक्रमाला नवी उभारी देण्यासाठी अनुभवी अध्यक्षांची गरज आहे. गेली चार वर्षे निवडणुका न झाल्याने बेस्ट उपक्रमावर प्रशासनराज आहे.
मुंबई महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमास निधी देण्यास हात आखडता घेतला आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी त्यांना सातत्याने मोठा संघर्ष करावा लागत आहे. नुकतीच झालेल्या बेस्ट बस भाडेवाढीने थोडीफार आर्थिक अवस्था सुधारली असली तरी तोटा मोठ्या प्रमाणात असल्याने आजही महापालिकेच्या आर्थिक मदतीवर बेस्टला अवलंबून राहावे लागत आहे. खासगीकरणामुळे बेस्ट खरेच फायद्यात आहे का तोट्यात आहे हे सुद्धा कळण्यास मार्ग नाही. बेस्ट उपक्रमावर अंकुश ठेवण्यासाठी सक्षम बेस्ट समिती व बेस्ट समिती अध्यक्षांची सध्या गरज असून बेस्टच्या निवृत्त व सध्या कायमस्वरूपी असलेल्या कर्मचाऱ्यांचे भवितव्य त्यांच्या हाती असणार आहे.