माणगाव : दिघी - पुणे महामार्गावरील मोर्बा रोडवर ट्रॅव्हलर बस आणि स्कूटी यांचा अपघात झाला. या अपघातात आठ वर्षांच्या आरुष गुगले याचा मृत्यू झाला.
साची गुगले, त्यांचे सासरे शांताराम गुगले आणि साची यांचा आठ वर्षांचा मुलगा आरुष हे स्कूटीवरून साई सायकल मार्ट माणगाव येथे जात होते. सायकलच्या टायरची दुरुस्ती करुन घेण्यासाठी ते जात होते. दुकानात जाण्यासाठी स्कूटी रस्त्याच्या कडेला लावून सर्व जण उतरले. स्कूटीवरुन उतरल्यावर आरुष वेगाने पुढे दुकानाच्या दिशेने जाऊ लागला. आरुष पुढे जात असताना माणगाव येथून मोर्बाच्या दिशेने वेगाने जात असलेल्या बसने आधी स्कूटीला ठोकरले पाठोपाठ आरुषला उडवले. आरुष गंभीर जखमी झाला. जखमांमुळे त्याचा थोड्या वेळाने मृत्यू झाला. साची यांनाही दुखापत झाली. वेगाने आलेली बस आणि रस्त्याच्या कडेला असलेली स्कूटी यांचेही नुकसान झाले. पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. माणगाव पोलीस ठाण्याचे पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. नरेंद्र बेलदार पुढील तपास करत आहेत.