छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाहनावर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. विशेष म्हणजे, हा हल्ला केवळ दगडफेक नव्हता, तर जलील यांच्या वाहनावर धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, या घटनेमुळे शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
'नव्यां'ना संधी अन् 'जुन्यां'ना केराची टोपली?
मिळालेल्या माहितीनुसार, इम्तियाज जलील हे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचार दौरा करत होते. मात्र, बायजीपुरा परिसरात पोहोचताच त्यांच्या पक्षातीलच नाराज कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला. यावेळी कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी जलील यांच्या गाडीवर हल्ला चढवला. काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, गाडीच्या काचा फोडण्यासोबतच धारदार हत्यारांचा वापर करून जलील यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला, मात्र सुदैवाने ते थोडक्यात बचावले आहेत. या हल्ल्यामागे पक्षांतर्गत असलेली मोठी नाराजी असल्याचे बोलले जात आहे. महापालिका निवडणुकीत अनेक वर्षांपासून पक्षासाठी राबणाऱ्या जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून, ऐनवेळी पक्षात आलेल्या नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. "पक्षासाठी रक्त आटवणाऱ्यांना डावलले जात असेल तर आम्ही शांत बसणार नाही," अशा भावना यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात एकमेकांचा किती आदर करतात, याची प्रचिती नुकतीच ...
पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. हल्ल्याच्या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज करून गर्दी पांगवण्यात आली आहे. सध्या जलील यांच्या ताफ्याभोवती मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली असून, या हल्ल्याचा सूत्रधार कोण? याचा तपास पोलीस करत आहेत.