'द वॉल' द्रविडचा विक्रम मोडीत काढून ३७ वे कसोटी शतक पूर्ण
सिडनी : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आपल्या बॅटची जादू पुन्हा एकदा दाखवली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या ॲशेस कसोटीच्या तिसऱ्या दिवशी स्मिथने झंझावाती फलंदाजी करत आपल्या कारकिर्दीतील ३७ वे कसोटी शतक पूर्ण केले. या शतकामुळे त्याने भारताचे दिग्गज फलंदाज राहुल द्रविड यांचा विक्रम मागे टाकत जागतिक क्रिकेटमध्ये एक नवा मैलाचा दगड प्रस्थापित कला आहे. या शतकासह स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्यांच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. त्याने राहुल द्रविड (३६ शतके) यांना मागे टाकले असून, तो आता सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या जागतिक यादीत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. आता त्याच्या पुढे फक्त कुमार संगकारा (३८), रिकी पाँटिंग (४१), जो रूट (४१), जॅक कॅलिस (४५) आणि सचिन तेंडुलकर (५१) हे खेळाडू आहेत.
ॲशेस मालिकेच्या इतिहासात स्मिथने आपले १३ वे शतक झळकावले आहे. त्याचप्रमाणे अॅशेसमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या अनेक फलंदाजांच्या यादीत त्याने जॅक हॉब्स यांना मागे सारून दुसरे स्थान पटकावले आहे. आता केवळ सर डॉन ब्रॅडमन (१९ शतके) हे स्मिथच्या पुढे आहेत. स्मिथच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली असून, क्रिकेट विश्वात त्याच्या फलंदाजीची आणि विक्रमांची जोरदार चर्चा सुरू आहे.
ऑस्ट्रेलियाची सामन्यावर पकड
स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड (१६३ धावा) यांच्यातील जबरदस्त भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाने पाचव्या कसोटीत इंग्लंडवर वर्चस्व मिळवले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने मोठ्या धावसंख्येकडे कूच केली असून, इंग्लंडचा संघ दबावाखाली दिसून येत आहे.
सर्वाधिक कसोटी शतके (२०२६ पर्यंतची स्थिती):
क्रमांक खेळाडू कालावधी सामने शतके
१ सचिन तेंडुलकर १९८९-२०१३ २०० ५१
२ जॅक कॅलिस १९९५-२०१३ १६६ ४५
३ रिकी पॉन्टिंग १९९५-२०१२ १६८ ४१
४ जो रूट २०१२-२०२६ १६३ ४१
५ कुमार संगकारा २०००-२०१५ १३४ ३८
६ स्टीव्ह स्मिथ २०१०-२०२६ १२३ ३७
७ राहुल द्रविड १९९६-२०१२ १६४ ३६