नवी दिल्ली : लाल किल्ला स्फोट प्रकरणातील आरोपी यासिर अहमद दार याची कोठडी १६ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने हा आदेश दिला असून यापूर्वी २६ डिसेंबर रोजी न्यायालयाने यासिर अहमद दार याला एनआयए कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात आतापर्यंत एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली होती. सध्या सर्व आरोपी न्यायालयीन आणि तपास यंत्रणांच्या कोठडीत आहेत. या स्फोटप्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडून सुरू आहे.
आत्मघाती बॉम्बर बनवण्यासाठी ब्रेनवॉश केल्याचा आरोप
या प्रकरणाशी संबंधित आणखी एक आरोपी जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश याला १८ नोव्हेंबर रोजी पटियाला हाऊस न्यायालयाने एनआयए कोठडी सुनावली होती. एनआयएने दानिशला श्रीनगरमधून अटक केली होती. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, स्फोटापूर्वी दानिशने ड्रोनमध्ये तांत्रिक बदल केल्याचा आणि रॉकेट असेंबल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
एनआयएच्या म्हणण्यानुसार, दानिशने कथित आत्मघाती बॉम्बर उमर नबीसह संपूर्ण कट रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राज्यशास्त्रात पदवीधर असलेल्या दानिशचा उमर नबीने आत्मघाती बॉम्बर बनण्यासाठी ब्रेनवॉश केल्याचा दावा तपास यंत्रणेकडून करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये तो कुलगाम येथील एका मशिदीत डॉक्टर मॉड्यूलला भेटण्यासाठी तयार झाला होता. त्यानंतर त्याला हरियाणातील फरीदाबाद येथील अल फलाह विद्यापीठात राहण्यासाठी नेण्यात आले.
लाल किल्ल्याजवळ चालत्या कारमध्ये स्फोट
१० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ एका चालत्या कारमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले होते. ही कार कथित आत्मघाती बॉम्बर उमर उन नबी चालवत असल्याची माहिती एनआयएच्या फॉरेन्सिक तपासातून समोर आली आहे.
उमर उन नबी हा जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी होता. तो फरीदाबाद येथील अल फलाह विद्यापीठात जनरल मेडिसिन विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. या स्फोटप्रकरणाचा तपास एनआयएने अधिक तीव्र केला असून, आरोपींच्या नेटवर्कचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.