गुवाहाटी : आसाममधून एक मोठी बातमी समोर आली आहे. आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.१ इतकी नोंदवण्यात आली असून, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र अचानक बसलेल्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अनेकांची झोपेतूनच धावपळ उडाली.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र २६.३७ अंश उत्तर अक्षांश आणि ९२.२९ अंश पूर्व रेखांशावर होते. हा भूकंप जमिनीखाली सुमारे ५० किलोमीटर खोलीवर झाला. पहाटेच्या शांततेत जोरदार धक्का बसल्याने अनेक नागरिक घाबरून घराबाहेर पडले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे जीवित किंवा मोठ्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तात्काळ वृत्त नाही. मात्र मध्य आसामच्या काही भागांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाचे हादरे नागरिकांना जाणवले. भूकंपाच्या वेळी अनेक नागरिक झोपेत असल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, आसामसह मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि ईशान्य भारतातील इतर काही भागांमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती आहे. मात्र हे हादरे तीव्र नसल्याने फारसा धोका निर्माण झाला नाही. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.