मुंबई : जागतिक मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप (यूएमजी) आणि बॉलीवूडमधील प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊस एक्सेल एंटरटेनमेंट यांच्यातील धोरणात्मक भागीदारीची घोषणा सोमवारी मुंबईत करण्यात आली. या करारानुसार, यूएमजीची भारतीय शाखा युनिव्हर्सल म्युझिक इंडिया (यूएमआय) एक्सेल एंटरटेनमेंटमध्ये ३० टक्के हिस्सा घेणार असून, कंपनीची एकूण किंमत २ हजार ४०० कोटी रुपये इतकी ठरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत याबाबत करार करण्यात आला. या करारामुळे भारताच्या क्रिएटिव्ह इकोनॉमीला जागतिक स्तरावर नवे बळ मिळाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले.
मुख्यमंत्री म्हणाले, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांच्यातील २ हजार ४०० कोटी रुपयांची धोरणात्मक भागीदारी ही केवळ एक व्यवहार नाही, तर भारत, महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईवरील जागतिक कंपन्यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. ही भागीदारी क्रिएटिव्ह इकोनॉमीच्या उज्ज्वल भविष्याचे प्रतिनिधित्व करते. भारताची क्रिएटिव्ह इकोनॉमी आता पूर्णपणे प्रगल्भ झाली आहे, हे यावरून सिद्ध होते. मुंबई आता जागतिक मनोरंजन क्षेत्राचे नेतृत्व करण्यास सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वेव्हज समिट'च्या माध्यमातून या कराराची बीजे रोवल्याबद्दल आभार मानत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जागतिक कंपन्या गुंतवणुकीसाठी पाच प्रमुख गोष्टी पाहतात. प्रतिभेची उपलब्धता, धोरणात्मक सातत्य, बौद्धिक संपदेचा आदर, अंमलबजावणीचा वेग आणि परिपूर्ण इकोसिस्टीम. या पाचही गोष्टी महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये उपलब्ध आहेत. यामुळे मुंबई केवळ प्रगती करणार नाही, तर जागतिक स्तरावर नेतृत्व करेल, यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे, असा विश्वास त्यांनी दिला.