मुंबई : भाजपने मुंबईत कोणत्याही जागा न सोडल्याने रिपाइंने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, भाजपशी मैत्रीपूर्ण लढती होतील असे सांगत अन्य सर्वत्र महायुतीला रिपाइंचा पाठिंबा असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घोषित केले. महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. जेथे महायुतीचे एकत्रित उमेदवार आहेत तेथे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, असे त्यांनी स्पष्ट केलेे. भाजप व शिंदे सेनेचे उमेदवार समोरासमोर उभ्या असलेल्या वाॅर्डांमधील रिपाइंची भूमिका मात्र अद्याप स्पष्ट झालेली नाही. महायुतीत मुंबईत एकत्र जागावाटप झाले तरी रिपाइंला जागा मिळाल्या नाहीत. याबद्दल नाराजी व्यक्त केली जात होती. ती दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास आठवले यांच्या स्वतंत्र बैठकाही घेतल्या. मात्र, त्यातून काही निष्पन्न झाले नसल्याचे स्पष्ट होते आहे. मुंबईत दलित-मुस्लिम मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. काँग्रेस-वंचित एकत्रपणे निवडणुकांना सामोरे जात आहेत, तर ठाकरे बंधूंनाही विशेषतः उबाठाना दलित मते मिळतील असे वाटते आहे. या तिहेरी लढतीत भाजपला रिपब्लिकन पक्षासाठी स्वतंत्रपणे जागा देणे उचित वाटले नसावे. तथापि, जागावाटप योग्यप्रकारे झाले नसले तरी आमची युती अभंग आहे. युतीत जिंकून येईल, असा विश्वासही रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.