मुंबई : पालिका निवडणुकीच्या अानुषंगाने उबाठा-मनसेने संयुक्त वचननामा प्रसिद्ध केला. त्यात ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याचे आश्वासन देण्यात आलेे. भाजपचे मंत्री आशीष शेलार यांनी त्यावर आक्षेप घेतला असून, मुंबईतील घरांना मालमत्ता करमाफी देण्याचा मुद्दा भाजपचा आहे. हा मुद्दा आता उबाठा आणि मनसेने चोरल्याचा आरोप करत, या वचननाम्याला त्यांनी ‘अपचननामा’ असे नाव दिले. शेलार म्हणाले, भाजपच्या नगरसेवकांनी ५०० ऐवजी ७०० चौरस फुटांपर्यंतची माफी देण्याची आग्रही मागणी केली होती. मात्र, तेव्हा पालिकेत सत्तेत असलेल्या उबाठाने फक्त ५०० चौरस फुटांचाच प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला. ७ मार्च २०१८ रोजी आम्ही ७०० ते ७५० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याचा प्रस्ताव पालिकेकडून घेण्याची मागणी केली होती. उबाठाने मात्र ७०० ते ७५० चौरस फुटांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यासच विरोध केला, ' असा आरोप आशीष शेलार यांनी केला. आता निवडणुकीच्या तोंडावर उबाठा आश्वासनांचा दिखावा करीत मुंबईकरांना फसवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमच्या जुन्या मागण्या चोरून वचननामा काढलात, तर तो वचननामा नव्हे, तर चोरलेल्या मागणीचा ‘अपचननामा’ होईल, असा टोला आशीष शेलार यांनी लगावला.