पालघर : जिल्ह्यातील तीन नगर परिषद व एका नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष, सभापती आणि स्वीकृत सदस्य निवडणुकीच्या आनुषंगाने भारतीय जनता पक्षाने चारही गटनेत्यांची निवड केली आहे.
पालघर, डहाणू, जव्हार या नगर परिषद आणि वाडा या नगरपंचायतीची निवडणूक २ डिसेंबर रोजी पार पडली. या निवडणुकीचा निकाल जाहीर २१ डिसेंबर रोजी झाला आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांसह थेट जनतेतून नगराध्यक्ष सुद्धा निवडण्यात आले आहेत. दरम्यान, नगर परिषद आणि नगरपंचायती मधील कामकाज आपल्या राजकीय पक्षाच्या ध्येय धोरणानुसार करण्यासाठी गट नेत्यांची भूमिका महत्त्वाची राहते. आता लवकरच चारही ठिकाणी नगर परिषद उपाध्यक्ष, विषय समिती सभापती आणि स्वीकृत सदस्यांची निवड करावी लागणार आहे. या निवडणुकीसाठी सुद्धा राजकीय पक्षातील गटनेत्याची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्या अानुषंगाने भाजप गटनेत्यांची निवड केलेली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या मार्गदर्शनात चारही गटनेत्यांची निवड केली आहे. याप्रसंगी आमदार हरिश्चंद्र भोये, वाडा नगराध्यक्ष रिमा गंधे, जवाहर नगराध्यक्ष पूजा उदावंत, कैलाश म्हात्रे, निवडणूक प्रमुख बाबाजी काठोळे तसेच पक्षाचे इतर वरिष्ठ पदाधिकारी व प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
असे आहेत गटनेते
डहाणू नगर परिषद -जगदीश राजपूत.
पालघर नगर परिषद - भावानंद संखे.
जव्हार नगर परिषद -कुणाल उदावंत.
वाडा नगरपंचायत -रामचंद्र भोईर.