मुंबई : इंजिनिअरिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी भारत सरकारच्या नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारत हॅव्ही इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अर्थात BHEL मार्फत प्रोजेक्ट इंजीनिअर आणि प्रोजेक्ट सुपरवायझर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मॅकेनिकलसह विविध तांत्रिक शाखांमध्ये ही भरती होणार असून अनुभवी उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.
या भरतीसाठी इच्छुक उमेदवार १२ जानेवारी २०२६ पर्यंत BHEL च्या अधिकृत careers.bhel.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. प्रोजेक्ट इंजीनिअर पदासाठी उमेदवारांकडे फुलटाइम इंजीनिअरिंग किंवा टेक्नोलॉजीमधील पदवी किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. जनरल आणि OBC उमेदवारांसाठी किमान ६० टक्के गुणांची अट असून SC आणि ST उमेदवारांसाठी ५० टक्के गुण ग्राह्य धरले जातील. यासोबतच किमान पाच वर्षांचा कामाचा अनुभव अनिवार्य आहे.
प्रोजेक्ट सुपरवायझर पदासाठी संबंधित शाखेतील इंजीनिअरिंग पदवी आवश्यक असून उमेदवारांकडे किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव असावा. या दोन्ही पदांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा २५ ते ३२ वर्षांदरम्यान निश्चित करण्यात आली आहे.
पगाराच्या बाबतीत ही भरती आकर्षक मानली जात आहे. प्रोजेक्ट इंजीनिअर पदासाठी दरमहा ९५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत वेतन दिले जाणार आहे, तर प्रोजेक्ट सुपरवायझर पदासाठी ४५ हजार ते ४८ हजार रुपये मासिक पगार मिळणार आहे. अर्ज करताना उमेदवारांना २३६ रुपये अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे.
या भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती आणि अधिकृत जाहिरात BHEL च्या वेबसाइटवर उपलब्ध असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी ती काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.