"हा शुभारंभ नव्हे, विजयाची नांदी!" ६८ बिनविरोध जागांवरून एकनाथ शिंदेंचा हुंकार
मुंबईचा महापौर 'मराठीच' होणार! शिंदेंची काळ्या दगडावरची भगवी रेघ
मुंबई : "मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होताच महायुतीचे ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असून, आजची सभा हा प्रचाराचा शुभारंभ नसून विजयाची नांदी आहे," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील प्रचाराचा शंखनाद केला. वांद्रे येथील 'डोम'मध्ये आयोजित महायुतीच्या महासभेत ते बोलत होते.
https://www.youtube.com/live/Y516Id3b2TU?si=5KC5GhFrVXHqcGtB
भ्रष्टाचाराच्या बकासुरापासून मुंबईची सुटका
एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "ही सभा म्हणजे मुंबईतील भ्रष्टाचाराविरोधातील एक मोठी ललकारी आहे. मुंबईला भ्रष्टाचाराच्या मगर मिठीतून आणि बकासुराच्या तावडीतून सोडवायचे आहे. लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ मिळून मुंबईवर महायुतीचा भगवा फडकवतील. मुंबईचा महापौर 'मराठीच' होणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे."
राज्यातील ८९३ प्रभागांत १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात; मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक स्पर्धा मुंबई : राज्यात दीर्घकाळाने होत असलेल्या २९ ...
'म' मलिद्याचा की मराठीचा? शिंदेंचा टोला
उद्धव ठाकरे आणि मनसेच्या संभाव्य जवळीकीवर निशाणा साधताना शिंदे म्हणाले, "जनतेने यांचा सीझन संपवल्यानंतर यांना आता व्हिजन आठवले आहे. यांनी मुंबईसाठी किंवा मराठी माणसासाठी केलेले एक तरी काम दाखवावे. यांचा 'म' हा मराठीचा नसून 'मलिद्याचा' आहे. आमचा 'म' मात्र मराठी, महाराष्ट्र आणि महायुतीचा आहे." त्यांनी पुढे स्पष्ट केले की, जनतेने बँड वाजवल्यानंतर यांना ब्रँडची आठवण झाली, पण खरा ब्रँड फक्त बाळासाहेब ठाकरे आणि सामान्य कार्यकर्ता आहे.
सूर्याजी पिसाळ कोण? टीकेला प्रत्युत्तर
'उबाठा' गटाकडून होणाऱ्या सूर्याजी पिसाळ या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे आक्रमक झाले. "बाळासाहेबांचे विचार जपणारा सूर्याजी पिसाळ की विचारांचा खून करणारे सूर्याजी पिसाळ? हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. गेल्या वेळी माझ्या विनंतीवरून देवेंद्रजींनी मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवला, पण हे लोक सत्तेसाठी लाचार झाले. आम्ही सत्तेसाठी गेलो नाही, तर मंत्रिपदावर पाणी सोडून तत्त्वासाठी बाहेर पडलो. आम्ही जीव गेला तरी तुमच्यासारखे लाचार होणार नाही," असे खडेबोल त्यांनी सुनावले.
विकासाचे वारकरी हवेत, मारेकरी नकोत
शिंदे यांनी संभाजीनगरमधील उमेदवारीवरूनही ठाकरेंना घेरले. "संभाजीनगरमध्ये रशीद मामूला तिकीट दिले, आज बाळासाहेब असते तर यांना उलटे टांगून फटके दिले असते," असे ते म्हणाले. तसेच, "दिवसभर नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स करण्याचा जमाना आता गेला आहे. मुंबईकरांना आता शहराचे मारेकरी नकोत, तर विकासाचे वारकरी हवे आहेत," असे म्हणत त्यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.