मुंबई : दररोज लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रेल्वे प्रशासनाने डिजिटल सेवांबाबत मोठा बदल केला आहे. प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या Rail One या नव्या अधिकृत मोबाईल ॲपमुळे आता UTS ॲपवरील मासिक पास आणि तिकीट काढण्याची सुविधा कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून वापरात असलेले UTS ॲप आता नवीन पास किंवा तिकीटासाठी वापरता येणार नाही.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई लोकलचे मासिक, त्रैमासिक आणि सहामाही पास आता केवळ Rail One या ॲपवरूनच उपलब्ध असतील. आतापर्यंत प्रवाशांना वेगवेगळ्या सेवांसाठी वेगवेगळे अॅप्स वापरावे लागत होते. ही अडचण दूर करण्यासाठी आणि वन नेशन, वन ॲप या संकल्पनेअंतर्गत Rail One ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपमध्ये तिकीट बुकिंगसोबतच ट्रेनचे लाईव्ह लोकेशन, प्लॅटफॉर्म क्रमांक, वेळापत्रक आणि इतर रेल्वे सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या बदलानंतर प्रवाशांना जुन्या UTS ॲपवरून नवीन पास काढता येणार नाही. मात्र, आधीच काढलेले पास वैध राहणार असून त्यांची मुदत संपेपर्यंत ते वापरता येतील. नवीन पास काढण्यासाठी किंवा पासचे नूतनीकरण करण्यासाठी Rail One ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. हे ॲप अँड्रॉइड आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
Rail One ॲपमध्ये UPI, नेट बँकिंग आणि डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्याची सोय देण्यात आली आहे. यासोबतच R-Wallet ची सुविधाही उपलब्ध आहे. तांत्रिक अडचणींमुळे तिकीट बुक करताना पैसे अडकण्याचे प्रकार टाळण्यासाठी हाय-स्पीड पेमेंट गेटवेचा वापर करण्यात आला आहे. यामुळे गर्दीच्या वेळेत स्थानकांवरील तिकीट खिडक्यांपुढील रांगा कमी होण्यास मदत होणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवाशांना जास्तीत जास्त Rail One ॲपचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.