मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार
मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या बुधवारी, ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्यांना इच्छितस्थळी जाणेयेणे सुकर व्हावे यासाठी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) बुधवार, ३१ डिसेंबर रोजी 'मेट्रो १' मार्गिकेवरील सेवा कालावधीत वाढ केली आहे. या मार्गिकेवर बुधवारी मेट्रोच्या २८ फेऱ्या वाढविण्यात आल्या असून 'मेट्रो १' मार्गिकेवर बुधवारी मध्यरात्री २.४५ पर्यंत मेट्रो गाड्या धावणार असल्याचे एमएमओपीएलच्यावतीने सांगण्यात आले आहे.
दरवर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने रात्री घराबाहेर पडतात. मुंबईतील समुद्र किनारे, पर्यटन स्थळे आणि इतर ठिकाणी मुंबकरांची प्रचंड गर्दी होते. नागरिकांना इच्छितस्थळी पोहचणे आणि घरी परतणे सोपे व्हावे यासाठी एमएमओसीएलने बुधवार, ३१ जानेवारी रोजी 'मेट्रो १' मार्गिकेवरील फेऱ्या, तसेच सेवा कालावधीत वाढ केली आहे. 'मेट्रो १' मार्गिकेवरील पहिली मेट्रो सकाळी ५.३० वाजता वर्सोवा आणि घाटकोपर येथून सुटते. तर शेवटची गाडी घाटकोपरवरून रात्री ११.५२ वाजता, तर वर्सोव्यावरून रात्री ११.२६ वाजता सुटते. नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणारा जल्लोष लक्षात घेता बुधवार, ३१ जानेवारी रोजी पहिली गाडी सकाळी ५.३० वाजता घाटकोपर आणि वर्सोव्यावरून सुटणार असून सेवा कालावधीत वाढ करण्यात आल्याने वर्सोव्यावरून शेवटची गाडी बुधवारी मध्यरात्री २.१४ वाजता सुटणार असल्याची माहिती एमएमओसीएलने दिली. तर घाटकोपरवरून शेवटची गाडी बुधवारी मध्यरात्री २.४० वाजता सुटणार आहे. 'मेट्रो १' मार्गिकेवर दररोज नियमित ४७६ फेऱ्या होतात. पण या मार्गिकेवरील बुधवारी २८ फेऱ्या वाढणार असून फेऱ्यांची संख्या ५०४ इतकी असेल. बुधवारी गर्दीच्या वेळी दर ३ मिनिट २० सेकेंदांनी, तर गर्दी नसताना दर ५ मिनिट ५५ सेकेंदांनी मेट्रो गाड्या धावणार आहेत. तर बुधवारी मध्यरात्री १२ नंतर सुटणाऱ्या गाड्या दर १२ मिनिटांनी धावणार असल्याचेही एमएमओसीएलकडून सांगण्यात आले. नव वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी ही बाब दिलासादायक असणार आहे. दरम्यान, लोकल, बेस्ट बसच्या विशेष फेऱ्या ३१ जानेवारी रोजी धावणार आहेत. 'आरे – कफ परेड भुयारी मेट्रो ३' मार्गिका दिवस-रात्र धावणार आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्यांची मोठी सोय होणार आहे.