पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशभरातून स्टार प्रचारक येणार
मुंबई : मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या महापालिकांची निवडणूक ही भाजप-महायुतीसाठी प्रतिष्ठेची, तर ठाकरे बंधूंसाठी अस्तित्त्वाची लढाई आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील प्रमुख महानगरपालिकांमध्ये महायुतीने विजय मिळवण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. याचाच भाग म्हणून ११, १२ आणि १३ जानेवारी या तीन दिवसांत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर या प्रमुख शहरांमध्ये महायुतीच्या जाहीर सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे.
या सभांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या इतर राज्यांतील मुख्यमंत्री आणि स्टार प्रचारकांची उपस्थिती असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ जानेवारीला मुंबईत दाखल होणार असून, त्यांच्या हस्ते पद्म भूषण पुरस्कार प्राप्त आचार्य श्री रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज यांनी लिहिलेल्या ५००व्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने जैन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जाणार आहे.
महानगरात प्रचाराचा मास्टरप्लान
महायुतीने मुंबई महानगरातील प्रचाराचा मास्टरप्लान तयार केला असून, उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षात घेऊन विशेष रणनीती आखली आहे. यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी, रवी किशन, मैथिली ठाकूर, गायक निरहुआ यांसारख्या स्टार प्रचारकांची फौज मैदानात उतरवली जाणार आहे. या स्टार प्रचारकांना मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पाचारण करण्यात येणार असून, उत्तर भारतीय मतदारसंघांमध्ये त्यांचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न आहे.
मुख्यमंत्री फडणवीस १० दिवसांत ४० सभा घेणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आगामी १० दिवसांत तब्बल ४० ते ४५ प्रचार सभा घेणार आहेत. प्रत्येक महापालिकेसाठी वेगळे नियोजन करण्यात आले असून, मोठ्या महापालिकांमध्ये (मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर) तीन ते चार सभांचे आयोजन केले जाणार आहे. छोट्या महापालिकांमध्ये प्रत्येकी एक सभा होईल. दिवसाला सरासरी ४ सभांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यामुळे प्रचाराला प्रचंड वेग येणार आहे. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या होत्या आणि आता महापालिका निवडणुकांमध्येही तेच चित्र दिसणार आहे.