हरमनप्रीतच्या ६८ धावा; मालिका ५-० ने खिशात
तिरुवनंतपुरम : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या डावात भारतीय संघाला सुरुवातीला मोठे धक्के बसले होते. पण हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने ७ गडी बाद १७५ धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून हसिनी परेरा आणि इमेशा दुलानीने दमदार अर्धशतकं झळकावली. पण श्रीलंकेचा संघ विजयापासून १५ धावा दूर राहिला. ही मालिका भारतीय संघाने ५-० ने आपल्या नावावर केली.
या सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी १७५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. संघाची कर्णधार चमारी अटापटू अवघ्या २ धावांवर माघारी परतली. हसिनी परेराने ६५ धावांची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इमेशा दुलानीने ५० धावांची खेळी केली. तर निलाक्षी डी सिल्वा अवघ्या ३ आणि कविशा दिल्हारीने ५ धावांवर माघारी परतली. शेवटी
या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. या सामन्यात स्मृती मानधनाला विश्रांती देण्यात आली. तिच्या जागी जी कमलिनीचा संघात समावेश करण्यात आला होता. पण तिला या संधीचा फायदा घेता आला नाही. कमलिनी अवघ्या १२ धावा करत माघारी परतली. तर गेल्या २ सामन्यांत लागोपाठ अर्धशतक झळकावणारी शफाली वर्मा अवघ्या ५ धावा करत माघारी परतली. हरलीन देओलला अवघ्या १३ धावा करता आल्या. भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले होते. पण कर्णधार हरमनप्रीत कौरने एक बाजू धरून ठेवली होती. हरमनप्रीतने ६८ धावांची दमदार खेळी केली. मोठे फटके खेळण्यासाठी ओळखली जाणारी ऋचा घोष या सामन्यात अवघ्या ५ तर दीप्ती शर्मा अवघ्या ७ धावांवर माघारी परतली.हरमनप्रीत कौरने अमनजोत कौरसोबत मिळून महत्त्वपूर्ण भागीदारी केली. तिने २१ धावा केल्या. तर शेवटी अरूंधती रेड्डीने नाबाद २७ धावा करत संघाची धावसंख्या ७ गडी बाद १७५ धावांपर्यंत पोहोचवली.
भारतीय संघाने मारली बाजी : येत्या काही महिन्यात भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे प्रत्येक मालिका ही सरावाच्या दृष्टीने भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. श्रीलंकेविरूद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ केला. पाचही सामन्यांत फलंदाज आणि गोलंदाजांनी आपली भूमिका योग्यरीत्या पार पाडली. यासह भारतीय संघाने ही मालिका ५-० ने आपल्या नावावर करून वर्षाचा शेवट गोड केला आहे.
संक्षिप्त धावफलक :
भारत महिला : २० षटकांत १७५/७
श्रीलंका महिला : २० षटकांत १६०/५