उमेदवारी अर्जांचा भरणा
नवी मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र ठरलेल्या नवी मुंबईत महायुतीतील प्रमुख पक्ष भाजप आणि शिंदेसेना एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र तयारी सुरू असल्याने युती तुटण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी नवी मुंबईत तब्बल तीन तास तळ ठोकत वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी युती व उमेदवार निवडीबाबत चर्चा केली. मात्र, याचवेळी भाजपने वाशी आणि सीवूड्स भागात शिंदेसेनेच्या माजी नगरसेवकांविरोधात सक्षम उमेदवार उभे करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस येथील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देत थेट रणशिंग फुंकण्यात आले.
ऐरोली, कोपरखैरणे, नेरूळ आदी उपनगरांमध्ये भाजप तसेच काही ठिकाणी शिंदेसेनेच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मुंबई आणि ठाण्यात भाजप–शिंदेसेना युतीचे सकारात्मक चित्र असताना नवी मुंबईतही युती व्हावी, यासाठी शिंदेसेनेकडून दबाव होता. मात्र नवी मुंबई हा आपला बालेकिल्ला असल्याने येथे कोणत्याही परिस्थितीत युती नको, अशी ठाम भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतली होती. महापालिकेवर स्वबळावर सत्ता आणण्याची क्षमता असल्याचा दावा त्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर मांडला होता.
दुसरीकडे, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांमध्ये युतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही होते. मात्र युतीच्या चर्चा पुढे सरकत असतानाच नवी मुंबईत भाप आणि शिंदेसेनेतील विसंवाद वाढत गेला.
समन्वय समितीच्या बैठकीत भाजपकडून शिंदेसेनेला अवघ्या २० जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याने तणाव आणखी वाढला. त्यानंतर युती तुटण्याचे संकेत स्पष्ट झाले होते. अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीस काही तास शिल्लक असतानाच त्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याच्या दिशेने घडामोडी वेगाने सुरू झाल्या. भाजपने १११ प्रभागांमध्ये उमेदवारांची अंतिम यादी तयार केल्याचे सांगितले जात असून, शिंदेसेनेनेही सर्व प्रभागांतील उमेदवारांची यादी सज्ज ठेवल्याचे समजते.