भाजप-शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन
नवी मुंबई : नवी मुंबईत युतीबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नसताना उबाठा गटातील शिवसेनेचे उपनेते विठ्ठल मोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नामांकन दाखल करण्यास आजचा दिवस शिल्लक असताना झालेल्या या पक्षांतरामुळे निवडणूक रणधुमाळी आणखी रंगतदार झाली आहे. विठ्ठल मोरे यांच्या भाजप प्रवेशानंतर वाशी मतदारसंघातून त्यांचा मुलगा अवधूत मोरे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मोरे यांनी दिली. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
दरम्यान, भाजप आणि शिवसेनेतर्फे (शिंदे गट) आज मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. उबाठाच्या तसेच शिवसेनेच्या (शिंदे गट)उमेदवारांनीही रॅली काढत अर्ज दाखल केल्याने नवी मुंबईत निवडणुकीचे वातावरण तापले आहे. ऐरोली, घणसोली, बेलापूर, वाशी, कोपरखैरणे आणि नेरुळ परिसरात दिवसभर राजकीय हालचाली दिसून आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडून केवळ एका माजी नगरसेवकाने आज उमेदवारी अर्ज दाखल केला. देवदर्शन आणि समर्थकांसह रॅली काढत आपली ताकद दाखवली.
नवी मुंबईत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या २८ पॅनलमधून १११ नगरसेवकांच्या जागांसाठी हजारोंच्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. युतीचा अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने काही प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. युती न झाल्यास उद्या आणखी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होतील, तसेच काही नेत्यांचे पक्षांतर होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
युतीबाबत अद्याप आशा कायम असल्याचे भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी स्पष्ट केले. “भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांच्याशी आज चर्चा झाली असून आम्ही सकारात्मक आहोत. परिस्थिती बदलली आहे आणि आजच युतीचे चित्र स्पष्ट होईल,” अशी माहिती त्यांनी दिली.