विरोधकांना आता करता येणार नाही मराठी आणि अमराठी वाद
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत मराठी आणि अमराठी वाद मुलुंडमधून जन्माला घातला जातो आणि मुलुंडमध्ये वाढत्या जैन गुजराती यांच्या प्रस्थामुळे मराठी माणसांवर अन्याय केला जातो अशाप्रकारचे वातावरण निर्माण केले जात असतानाच आता मुलुंमध्ये भाजपाने मराठी टक्का कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मुलुुंड विधानसभेत एकूण सहा नगरसेवक असून त्यातील दोन नगरसेवक हे अमराठी होते. परंतु याही वेळेत मराठी उमेदवारांचा टक्का कायम राखला गेला आहे. त्यामुळे मुलुंडमधील मराठी उमेदवारांचा टक्का कायम राखल्याने विरोधकांना यंदा टीका करायला कोणतीही संधीच उरणार नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
मुलुंड विधानसभेत सन २०१७च्या महापालिका निवडणुकीत मनोज कोटक, प्रभाकर शिंदे, प्रकाश गंगाधरे, नील सोमय्या, रजनी केणी(मृत), समिता कांबळे आदी नगरसेवक निवडून आले होते. यामध्ये दोन अमराठी वगळता इतर चारही मराठी चेहरे निवडून आले होते. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मराठी आणि अमराठी मुद्दयावरून विरोधकांनी टिका करण्यास सुरुवात करत भाजपाला कोंडीत पकडण्याचे काम केले होते.. मुलुंडमध्ये यापूर्वी मनोज कोटक खासदार म्हणून निवडुन आल्यानंतर तसेच याठिकाणी मिहिर कोटेचा हे आमदार म्हणून निवडून आले तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिल्यामुळे याठिकाणी अमराठी आणि मराठी मुद्दा पेटला गेला होता. त्यातच मराठी माणसाला घर नाकारल्याने निर्माण झालेल्या वादामुळे हा मुद्दा अधिक पेटला गेला होता. त्यामुळे मुलुंड हा मराठी आणि अमराठी वादाचे केंद्र बिंदू ठरले आहे.
त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत या विधानसभेतून मराठी उमेदवारांचे पत्ते कापले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे या प्रभागात प्रकाश गंगाधरे, प्रभाकर शिंदे आणि समिता कांबळे यांचे प्रभाग खुले झाल्याने यांचे पत्ते कापले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, समिता कांबळे यांचा पत्ता कापला गेला असून प्रकाश गंगाधरे आणि प्रभाकर शिंदे यांची उमेदवारी कायम राखली गेली आहे.शिवाय अन्य दोन प्रभागांमध्ये अनिता वैती, दिपिका घाग यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय हेतल गाला मोर्वेकर यांनाही उमेदवारी दिल्यामुळे मुलुंडमध्ये एकमेव नील सोमय्या वगळता उर्वरीत चार प्रभागांमध्ये मराठी चेहऱ्यांना संधी दिली आहे. तसेच हेतल गाला या लग्नानंतर मराठी बनल्याने त्यांनाही उमेदवारी दिल्यामुळे या विधानसभेतील सहा पैकी पाच प्रभागांमध्ये मराठी उमेदवारांना संधी दिल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुलुंडमध्ये विरोधकांना आता मराठी आणि अमराठी मुद्दा उठववण्याची संधीच दिलेली नाही. यंदाची निवडणूक ही मराठीच्या मुद्दयावर असल्याने आणि मुलुंड विधानसभा क्षेत्र याच्या केंद्र बिंदू असल्याने यंदा भाजपाने ही काळजी घेतल्याने विरोधकांना आता टिका करण्यासाठी नवीन संधी शोधावी लागेल,असे बोलले जात आहे.