निवडणूक आयोग अर्जाद्वारे घेणार लिहून
सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आता उमेदवारांकडून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र, या उमेदवारांच्या अर्जातील रकान्यांमध्ये काही अंश राज्य निवडणूक आयोगाने बदल केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये महापालिका सार्वत्रिक निवडणुकीकरता अर्ज भरणाऱ्या उमेदवारांकडून नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर कोणत्या प्रकारची आणि कोणती कामे केली जाणार आहेत हे लेखी स्वरुपात मांडून घेतले जात आहे. त्यामुळे प्रभागातील विकासाची स्वप्ने आपण कशी पाहता आणि आपल्या स्वप्नातील प्रभाग कसा आहे याची टिप्पणीच लिहून घेत एकप्रकारे नगरसेवक प्रभागाच्या विकासकामांसाठी किती कटिबध्द आहे याची माहिती जाणून घेतली जात आहे.
मुंबई महापालिकेच्या २०२५ -२६च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांना उमेदवारी पत्रे देण्यास मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ पासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत सर्व निवडणूक कार्यालयांमधून सुमारे ९ हजारांहून अधिक उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे, तर शुक्रवारपर्यंत एकूण ०९ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. परंतु यंदा उमेदवारी अर्ज भरताना शेवटच्या रकान्यामध्ये उमेदवाराचे शहर आणि प्रभागाप्रति असलेले ध्येय,लक्ष्य आदी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या अर्जामध्ये मतदार संघ विकास योजनासंदर्भात, जर मी निवडून आल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राच्या विकासासाठी मी खालील प्रमाणे उपायोजना करीन अशाप्रकारे कमीत कमी १०० आणि जास्तीत जास्त ५०० शब्दांमध्ये लिहून घेण्यात येत आहे.
एकप्रकारे आता भावी नगरसेवकांकडून प्रभागाच्या विकासाचे व्हिजन जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात असून अर्जामध्ये नमुद केल्यामुळे पुढे उमेदवार निवडून आल्यास अर्जातील शपथपत्रात लिहून दिल्याप्रमाणे ते मतदारांशी बांधिल असतील. त्यामुळे एकप्रकारे प्रभागाचा वचननामाचा भावी नगरसेवकांकडून अर्जाच्या माध्यमातून पटलावर आणला जात आहे.
त्यामुळे प्रत्येक भावी नगरसेवकाला पुढील पाच वर्षांमध्ये कोणतील सेवा सुविधांची कामे तसेच पायाभूत सेवा सुविधांसह पायाभूत विकास प्रकल्पांची कामे केली जाणार आहेत. वाहतूक कोंडी,रस्ते विकास, मलनि:सारण वाहिन्यांची सुधारणा, गटारांची सुधारणा, कचऱ्याची स्वच्छता तसेच पाणी समस्या आदींबाबतचे व्हिजन या अर्जाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला सादर करावे लागणार आहे. या व्हिजनद्वारे भावी नगरसेवक आपल्या प्रभागाच्या विकासासाठी काय काम करेल आणि खरोखरच त्याची दूरदृष्टी प्रभागाच्या विकासाच्या दृष्टीने आहे का याचीही माहिती आयोगाला होणार आहे.
काही निवृत्त निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सन २०१२पासून अशाप्रकारे भावी नगरसेवकांकडून प्रभागाच्या आणि शहराच्या विकासाचे त्यांचे व्हिजन जाणून घेण्याचा आणि या अर्जामध्ये नमुद करण्याची तरतूद आहे. मात्र, याची चर्चा यंदाच्या निवडणुकीत अधिक झाली आहे,असे त्यांचे म्हणणे आहे.